या मंत्र्याचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची घोषणा

| Updated on: Nov 09, 2022 | 7:01 PM

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना जामीन मिळाला ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

या मंत्र्याचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची घोषणा
बाळासाहेब थोरात यांचा संयम पाळण्याचा सल्ला
Follow us on

हिंगोली : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. जालना येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी रेखा तौर यांनी तर अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना विचारलं. ते म्हणाले, जशास जसे त्यांना उत्तर देण्याची गरज नाही. कार्यकर्त्यांनी संयम पाळावा, असा सल्ला थोरात यांनी दिलाय. अब्दुल सत्तार चुकलेच मी या मताचा आहे. एक मंत्री या पातळीवर जाऊन बोलतोय ही न पटणारी गोष्ट आहे. याला उत्तर त्यांच्याच भाषेत द्यावं असं मला वाटत नाही, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

ज्या प्रकारची वक्तव्य यांच्याकडून चाललीये आहेत, याबद्दल जनमानसात नाराजी आहे. आपण थोडा संयम पाळावा. लोकं या बाबतीतचा निर्णय येत्या काळात नक्की घेणार आहेत, असा सल्ला बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांना जामीन मिळाला ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. त्यांना खूप त्रास सहन करावा लागलेला आहे. शेवटी न्याय मिळतो. पण तो उशिराने मिळतो, अशी आमची भावना आहे. पण ते बाहेर आलेत याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

भारत जोडो यात्रेतून नेत्यांच्या मुलांना पुढे आणण्याचं काम सुरू आहे, असा आरोप अशोक चव्हाण यांच्यावर होतोय. असं बाळासाहेब थोरात यांना विचारलं असता भारत जोडो यात्रा ही भेद दूर करण्यासाठी आणि लोकशाहीची मूल्य रुजविण्यासाठी असल्याचे थोरात म्हणाले. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया राजकारणात आल्या तर आम्हाला आनंदच आहे, असे थोरात म्हणाले.