Pune सुपरफास्ट : पुणे जिल्ह्यातील पाच बातम्या एकाच क्लिकवर

| Updated on: Jul 08, 2021 | 2:50 PM

पुणे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी नियमित शाळा सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे.

Pune सुपरफास्ट : पुणे जिल्ह्यातील पाच बातम्या एकाच क्लिकवर
Pune Superfast
Follow us on

पुणे : पुणे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर मागील 15 दिवसांपासून धरण साखळीतील पाऊस गायब झाल्यामुळे खडकवासला धरणसाखळीत 29.73 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पुणेकरांसाठी दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्यांचा एकाच क्लिकवर आढावा. (Pune City Superfast News on 08th July 2021)

संजय राऊतांचा पुणे दौरा

शिवसेना खासदार संजय राऊत पुढचे 3 दिवस पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकांच्या तयारीचा आढावा राऊत घेणार आहेत. संजय राऊत गुरुवारी पुण्याला रवाना होत आहेत.

जिल्हा परिषद शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा

पुणे ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी नियमित शाळा सुरु करण्यास सहमती दर्शवली आहे. यामुळे किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरु होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत शालेय व्यवस्थापन समित्यांना अधिकार दिले आहेत. हे अधिकार देण्यापूर्वी किती गावे, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समित्या गावांतील प्राथमिक शाळा नियमितपणे सुरु करण्यास तयार आहेत, याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते.

खडकवासला धरणसाखळीत पाणीसाठा कमी

खडकवासला धरणसाखळीत 29.73 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील 15 दिवसांपासून धरण साखळीतील पाऊस गायब झाला आहे. पावसाआभावी धरणाच्या पाणीसाठ्यात फार मोठी वाढ होऊ शकली नाही. मंगळवारी दिवसभरात खडकवासला येथे 15 मिलीमीटर पाऊस पडला, तर उर्वरित पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तिन्ही धरणात पाऊस झालाच नाही. आज अखेर चारही धरणात मिळून एकूण 8.66 टीएमसी म्हणजे 29.73 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्याला पोलिस कोठडी

जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि धमकी दिल्याप्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. यापूर्वी अटक करण्यात आलेली बऱ्हाटेची पत्नी संगीता आणि वकील सुनील अशोक मोरे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर, मुलगा मयुरेश याची 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.

मावळ पंचायत समिती सभापतीपदाची निवडणूक

मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी ज्योती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निकिता घोटकुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त पदाची निवडणूक ही निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी संदेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली येथील सभागृहात संपन्न झाली. मावळ पंचायत समितीच्या सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गाला असतानाही अनुसूचित जातीच्या उमेदवाराला या पदाचा मान मिळाला आहे.

(Pune City Superfast News on 08th July 2021)