Malegaon Corona | तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आता ‘मालेगाव पॅटर्न’चा अभ्यास, आरोग्य विद्यापीठाकडून 40 तज्ज्ञांचे पथक

देशपातळीवर लक्ष वेधणाऱ्या आणि कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या ‘मालेगाव पॅटर्नचा’ अभ्यास आरोग्य विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे. यासाठी 40 तज्ज्ञांचे पथक ‘मालेगाव पॅटर्न’चा अभ्यास करणार आहे.

Malegaon Corona | तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आता मालेगाव पॅटर्नचा अभ्यास, आरोग्य विद्यापीठाकडून 40 तज्ज्ञांचे पथक
corona testing
| Edited By: | Updated on: Jan 13, 2022 | 11:57 AM

नाशिक : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचे संकट गडद होत असून ओमिक्रॉनचे रुग्णदेखील आढळून येत आहेत. या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर निर्बंध लादण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे असताना मालेगाव (Malegaon) मात्र त्याला अपवाद ठरले आहे. याच कारणामुळे राज्य नव्हे तर देशपातळीवर लक्ष वेधणाऱ्या आणि कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या ‘मालेगाव पॅटर्नचा’ अभ्यास आरोग्य विद्यापीठाकडून करण्यात येणार आहे. यासाठी 40 तज्ज्ञांचे पथक ‘मालेगाव पॅटर्न’चा अभ्यास करणार आहे.

घटलेल्या रुग्णसंख्येमुळे ‘मालेगाव पॅटर्न’ची देशभर ओळख

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात पहिल्या लाटेने थैमान घातले होते. मात्र त्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मालेगावमध्ये रुग्णवाढीचा फारसा परिणाम दिसला नाही. येथील घटलेल्या रुग्णसंख्येमुळे बघता-बघता ‘मालेगाव पॅटर्न’ची ओळख देशभर पसरली. या काळात येथे कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मालेगावच्या जनतेची कोरोनवर मात करताना प्रतिकारशक्ती आहे आणि तेथूनच ‘मालेगाव पॅटर्न’ उदयास आला.आता याचाच शोध आरोग्य विद्यापीठ घेणार आहे.

शास्त्रीय कारण शोधले जाणार 

मालेगावकरांची जीवनशैली, खाण-पान याचा शास्त्रीय अभ्यास करून “मालेगाव पॅटर्न”चे खरे उत्तर आता आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरु माधुरी कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या टीमकडून शोधण्यात येणार आहे. जग व देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी संशोधन सुरू असून याचे उत्तर मालेगाव पॅटर्नमध्ये दडलेलं आहे. केवळ तर्क लावून चालणार नाही तर त्यावरील शास्त्रीय कारण शोधले पाहिजे. त्याचा फायदा हा देशातच नव्हे तर जगालाही होईल हा त्यामागचा उद्देश असल्याचे मत जिल्हाधिकारी यांचे आहे.

संगनकिकृत प्रक्रियेचा वापर करण्यात येणार

मालेगाव पॅटर्नमुळे मालेगावात कोरोना नियंत्रणात राहिला. त्यामुळे या अभ्यासात येथील जीवनशैली, लसीकरण झाले की नाही, कोरोना संक्रमणाच्या वेळेस झालेले उपचार, परिसर अभ्यास, नागरिकांचे वर्तन, कोरोनाच्या विरोधात वाढलेली हिंमत यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात येणार आहेत. यासाठी सर्वेक्षणासाठी व अँटिबॉडीज तपासणीसाठी संगनकिकृत प्रक्रियेचा वापर करण्यात येणार आहे.

देश तसेच जगालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता  

आरोग्य विभागाकडून मालेगावातील एकूण दोन हजार नागरिकांच्या दिनचर्येचा अभ्यास केला जाणार आहे. पंधरा दिवसांत केलेल्या अभ्यासाचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाणार आहे. दरम्यान मालेगाव पॅटर्नचा बोलबाला सध्या राज्य तसेच देशभरात पसरला आहे. हा पॅटर्न नेमका काय ? कशा पद्धतीने मालेगावमध्ये करोनाला हरविण्यात आले याबाबत अभ्यास  केला जाणार आहे. त्यामुळे या अभ्यासाचा जगालाही फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.

इतर बातम्या :

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पंतप्रधानांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, उद्धव ठाकरे यांच्यावतीनं राजेश टोपे आढावा मांडणार

Video : कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं चीनमध्ये काय घडतंय?