सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी

| Updated on: Jan 13, 2021 | 2:42 PM

राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांची भाजपातून हकालपट्टी
Follow us on

सोलपूर : उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेली. त्यानंतर राजेश काळे यांची आज (13 जानेवारी) भाजपातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी याबाबत घोषणा केली. राजेश काळे यांच्यावर महापालिका उपायुक्त धनराज पांडे यांना र्वाच्य भाषेत शिवीगाळ करून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सविस्तर अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता. भाजपच्या गोटातून त्यांची उपमहापौर पदावरुन आणि पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी होती. त्यामुळे अखेर भाजपच्या कार्यकारिणीने हा निर्णय घेतला (Solapur Deputy Mayor Rajesh Kale remove from BJP Party).

नेमकं प्रकरण काय?

माजी मंत्री सुभाष देषमुख यांच्या लोकमंगल समुहाच्यावतीने आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यासाठी ई टॉयलेट कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही. ई-टॉयलेट कचरापेट्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करणं अपेक्षित असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं मत होतं. अधिकाऱ्यांच्या मतावरुन संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी यांना फोन करुन शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केली. तसंच उपायुक्त पांडे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा काळे यांच्यावर आरोप आहे. बेकायदेशीर कामासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यातूनच त्यांनी खंडणीची मागणी केली, असा आरोप महापालिका उपायुक्त पांडे यांनी केलाय. काळे यांच्याविरोधात सोलापूरच्या बझार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत नियमबाह्य कामे आणि कर्मचाऱ्यावर दबाव आणून कामे करून घेणे खपवून घेणार नसल्याचा इशारा पालिका आयुक्तांनी दिला.

शिवीगाळ आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपमहापौर राजेश काळे हे फरार होते. त्यांच्या शोधासाठी सदर बझार पोलिसांकडून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं रवाना करण्यात आली होती. त्यानंतर 5 जानेवारी रोजी अखेर त्यांना टेंभूर्णीजवळ अटक करण्यात आली आहे. राजेश काळे यांच्याविरुद्ध 29 डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत काळे यांना टेंभूर्णी परिसरात अटक केली होती.

दुसरीकडे भाजपातील काही लोकांनीच माझ्याविरूद्ध षडयंत्र रचल्याचा राजेश काळे यांनी आरोप केला आहे. मी अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे मात्र खंडणी मागितले नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच पोलिस चौकशीला सामोरे जाण्याची तयारी सुद्धा काळे यांनी दाखवली आहे (Solapur Deputy Mayor Rajesh Kale remove from BJP Party).

संबंधित बातम्या:

सोलापूरच्या उपमहापौरांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ?, खंडणीचा गुन्हा दाखल

सोलापूरच्या उपमहापौरांवर आधी खंडणीचा गुन्हा, आता पक्षाची शिस्तभंग नोटीस, पुढे काय होणार?