EV Charging Stations: आता पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, कोणत्या भागात किती चार्जिंग स्टेशन्स?; वाचा एका क्लिकवर

| Updated on: Apr 04, 2022 | 7:08 PM

राज्यात पारंपारिक इंधनाऐवजी आता हायड्रोजन इंधनाचा वापर करून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

EV Charging Stations: आता पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, कोणत्या भागात किती चार्जिंग स्टेशन्स?; वाचा एका क्लिकवर
आता पेट्रोल पंपांवर ईव्ही चार्जिंग स्टेशन्स, कोणत्या भागात किती चार्जिंग स्टेशन्स?; वाचा एका क्लिकवर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे: राज्यात पारंपारिक इंधनाऐवजी (fuel) आता हायड्रोजन इंधनाचा वापर करून वीज निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याच्या ऊर्जा विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. महावितरण, महापारेषण आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने पेट्रोल पंपांच्या आवारात ईव्ही चार्जिंग स्टेशन (EV Charging Stations) उभे करण्यासाठी पेट्रोल कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे मॉडेल यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यावर भर दिला जाईल. येत्या काही दिवसात नवी मुंबईमध्ये 60, नाशिक आणि ठाण्यात प्रत्येकी 25, नागपूर 34 चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचे निश्चित केले आहे. या अभियानास भागधारक घटकांचा चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महावितरणने ‘पॉवरअपईव्ही’ हे ॲप विकसित केले आहे, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी दिली.

पुणे येथे आयोजित पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांच्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नितीन राऊत बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित होते. कार्यक्रमाला नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्स इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष सुधीर मेहता आदी उपस्थित होते.

राज्यात पारंपरिक इंधनाऐवजी हायड्रोजन इंधनाचा वापर करून विजनिर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असून या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच आदर्श राज्य असेल. इलेक्ट्रिक वाहनांना वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन राज्यात ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यासाठी महावितरण कंपनी सक्रिय पुढाकार घेत आहे, असं नितीन राऊत यांनी सांगितलं.

पर्यायी इंधनाचे पर्याय हवेच

पर्यायी इंधनासारखे पर्याय जनतेला हवे आहेत, त्यासाठी असे उद्योग पुढे येणे गरजेचे आहे. उद्योग सुरू करण्यासाठी अडथळे आल्यास विकासाची गती मंदावते. हे लक्षात घेऊनच शासन स्तरावर उद्योगांना अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्र हे नेहमी पुढे जाणारे आणि देशाला दिशा दाखविणारे राज्य आहे. इथल्या विकासाचे देशभरात अनुकरण केले जाते. पर्यायी इंधनाच्या क्षेत्रातदेखील महाराष्ट्र लौकिकास साजेशी कामगिरी करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.

राज्यभरात पर्यायी इंधनावरील वाहने पोहोचवा

कोरोनाप्रमाणे प्रदूषणदेखील हानिकारक आहे. जगभरात पर्यावरण बदलामुळे होणारे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. हे टाळण्यासाठी पर्यावरणाची हानी न होऊ देता शाश्वत विकासावर भर देणे आवश्यक आहे. पर्यावरणाची अधिक हानी होऊ न देता दीर्घकाळ टिकेल आता शाश्वत विकास करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार करणे गरजेचे असून पर्यायी इंधन परिषदेच्या माध्यमातून राज्यभरात पर्यायी इंधनावरील वाहने पोहोचवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

पर्यायी इंधन हे देशाचे आणि जगाचे भविष्य-राजीव कुमार

पर्यायी इंधन हे देशाचे आणि जगाचे भविष्य आहे. ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, मिथेनॉल, वायू आणि सौर उर्जेकडे आपल्याला वळावेच लागेल. भविष्यात या क्षेत्रात मोठी संधी आहे. पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी पर्यायी इंधनाचा विचार आवश्यक आहे. भारताने विकासाचा वेग वाढविताना सोबतच पर्यावरणाचा विचार केला आहे. देशातील २६ राज्यांनी विद्युत वाहन धोरण जाहीर केले आहे. महाराष्ट्र या क्षेत्रात अग्रेसर असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितलं.

भविष्यात विद्युत दुचाकींची किंमत कमी होईल असे सांगून ते म्हणाले, या क्षेत्रातील संशोधन आणि विकासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उद्योगांनी शैक्षणिक संस्थांशी समन्वय साधून या बाबीवर भर द्यावा. पुणे क्लस्टर यादृष्टीने पर्यायी इंधन क्षेत्रातील उदाहरण ठरावे. शहरांमधील चार्जिंग स्टेशन सुविधादेखील महत्वाची असून नीती आयोग यासंदर्भात आवश्यक प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले.

ई-वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र आघाडीवर

पारंपरिक इंधनाच्या वापरामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत असून यामध्ये वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा मोठा वाटा आहे. त्याबाबत जनजागृती तसेच उपाययोजनांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक वाहनांविषयी मोठी जनजागृती झाली असून या वाहनांची विक्री 2 ते 3 हजार वाहनांवरुन 2021-23 मध्ये 22 हजारांवर पोहोचली आहे. दुचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या विक्रीत महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यात ई-रिक्शालाही प्रोत्साहन देण्यावर पुढील काळात भर दिला जाईल, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या माध्यमातून पुढील काळात मुंबई किंवा नाशिक येथे नागरी नियोजनबाबत जागतिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. कोल्हापूर येथे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाच्या अनुषंगाने परिषद आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर येथे हरित ऊर्जा परिषद घेण्यात येईल. हरित इकोसिस्टीमसाठी हरित इंधनाद्वारे वीजनिर्मिती याबाबत विचार याद्वारे केला जाईल, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Pune bouncer issue : …तर शाळेची मान्यता रद्द करणार; शिक्षण उपसंचालकांनी दिला इशारा

मार्गदर्शन करणं हा राजकारण्यांचा आवडता छंद, पर्यायी इंधन परिषदेत मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद

Dilip Walse Patil : ‘धार्मिक वाद निर्माण करून रस्त्यावर उतरायचं आणि पुन्हा कायदा-सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करायचे’