महादेव-पार्वतीच्या बाईकवर असलेल्या फोटोवरुन वाद, हिंदू संघटनांकडून एफआयआर दाखल, दोघांना अटक

| Updated on: Jul 10, 2022 | 6:50 PM

सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या दूर करण्यासाठी भगवान महादेवाला साकडे घालतात, असे शिव झालेल्या ब्रिनिचाने सांगितले आहे. लोकांमध्ये जागरुकतेचा प्रयत्न करण्यासाठी देवी देवतांचा वेश घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

महादेव-पार्वतीच्या बाईकवर असलेल्या फोटोवरुन वाद, हिंदू संघटनांकडून एफआयआर दाखल, दोघांना अटक
Aasam Street play drama
Image Credit source: ANI
Follow us on

आसाम – भगवान महादेव आणि पार्वती (Lord Shiva)यांची वेशभूषा करत, दोन कलाकारांनी महागाईच्या विरोधात पथनाट्य (street play)केले. दोन्ही कलाकार या पथनाट्यासाठी बाईकवरुन आले होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासहित अनेक हिंदू संघटनांनी (Hindu Organization) यावर आक्षेप घेत, हा देवी-देवतांचा अपमान असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या दबावानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या दोन्ही कलाकारांना पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तताही करण्यात आली. सर्वसामान्यांना जागरुक करण्यासाठी अशी वेशभूषा केल्याचे या कलाकारांनी सांगितले आहे.

नेमके काय आहे प्रकरण

असामाच्या नागाव गावात शनिवारी शिव आणि पार्वतीच्या वेषात दोन कलाकार बुलेटवरुन निघाले होते. रस्त्याच अचानक त्यांच्या गाडीतील पेट्रोल संपले. त्यानंतर पार्वतीची भूमिका करणारी अभिनेत्री, शंकर झालेल्या अभिनेत्यावर नाट्यमयरित्या नाराज झाली. एखाद्या नाट्यप्रयोगाप्रमाणे रस्त्यावर या नवरा-बायकोचे भांडण सुरु झाले. पेट्रोल संपण्यावरुन सुरु झालेला हा वाद महागाईपर्यंत पोहचला, आणि सर्वसामान्यांना कशी महागाईची झळ पोहचते आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या पथनाट्यातून या कलाकारांनी केला.

सर्जनात्मक, रचनात्मक विरोध हा अपमान नव्हे, कलाकारांचे आवाहन

शिव झालेल्या कलाकाराचे नाव ब्रिनिचा बोरा असे आहे. तर पार्वती झालेल्या अभिनेत्रीचे नाव परिस्मिता दास असे आहे. लोकांचे लक्ष आकर्षित व्हावे यासाठी रचनात्मक विरोधाचे नाटक केल्याचे या कलाकारांनी पोलिसांना सांगितले. सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या दूर करण्यासाठी भगवान महादेवाला साकडे घालतात, असे शिव झालेल्या ब्रिनिचाने सांगितले आहे. लोकांमध्ये जागरुकतेचा प्रयत्न करण्यासाठी देवी देवतांचा वेश घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

केवळ वेशभूषा करणे हा गुन्हा नाही-मुख्यमंत्री

केवळ वेशभूषा केली हा अपराध नाही, असे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनीही स्पष्ट केले आहे. जर काही आपत्तीजनक टिप्पणी त्यांनी केली असेल तर ते चुकीचे असल्याचे बिस्वा म्हणाले. देवी-देवतांच्या रुपात पथनाट्य करणाऱ्या या दोघांनाही आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.