India Maldive Row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणाव कायम आहे. दोन्ही देशांमध्ये आता संबंध लवकर सामान्य होतील असे चिन्ह अजिबात दिसत नाहीत. कारण मालदीवमध्ये भारतविरोधी आणि चीन समर्थक सत्तेत आले आहे. त्यामुळे भारतासाठी आता मालदीवर डोकेदुखी ठरु लागला आहे. मालदीवमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या संसदीय निवडणुकीत भारत समर्थक मालदीवियन नॅशनल पार्टीचा पराभव झाला असून, मोहम्मद मुइज्जू यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. मालदीवच्या संसदेत आधी भारत समर्थक पक्षांचे बहुमत होते. पण आता मोहम्मद मुइज्जू सत्तेत आल्याने त्यांनी भारतासोबतचे अनेक करार रद्द केले आहेत. असं असलं तरी भारताने मालदीवसोबत संबंध सामान्य राहवे म्हणून प्रयत्न सुरुच ठेवले आहेत. पण आता हाच मालदीव भारतासाठी डोकेदुखी ठरत असल्याने भारत त्याचा इलाज कसा करतो हे पाहावे लागणार आहे.
4,500 टन वजनाचे हायटेक चिनी ‘स्पाय’ जहाज पुन्हा एकदा मालदीवमध्ये पोहोचले आहे. दोन महिन्यांपूर्वीही मालदीवमधील विविध बंदरांवर एक आठवडा हे जहाज फिरत होते. जियांग यांग हाँग 03, एक चिनी हेरगिरी जहाज गुरुवारी सकाळी थिलाफुशी औद्योगिक बेटाच्या बंदरात डॉक करण्यात आले, अशी माहिती Adhadhu.com या न्यूज पोर्टलने शुक्रवारी दिली.
मालदीवच्या सरकारने मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ‘इंडिया आऊट’चा नारा देत सत्तेत आलेले मुइज्जू यांनी 21 एप्रिल रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीत देखील विजय मिळवला आहे. पण त्यानंतर चीनच्या मांडीवर जाऊन बसलेले मुईज्जू आता भारतासाठी डोकेदुखी ठरत आहेत. कारण चीन मालदीवच्या मदतीने हिंद महासागरात हेरगिरी करत आहे. हिंद महासागरात भारताचे वर्चस्व आहे.
चिनी जहाज यापूर्वी 23 फेब्रुवारी रोजी मालेच्या पश्चिमेला सुमारे 7.5 किमी अंतरावर असलेल्या त्याच थिलाफुशी बंदरावर थांबले होते.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने 23 जानेवारी रोजी सांगितले होते की, “मालदीवच्या क्षेत्रात असताना हे चिनी जहाज कोणतेही संशोधन करणार नाही.” पण, तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मालदीव पूर्णपणे खोटे बोलत आहे.
मालदीव भारताच्या लक्षद्वीप समुहातील मिनिकॉय बेटापासून फक्त 70 नॉटिकल मैल दूर आहे, तर मालदीव भारतीय मुख्य भूमीपासून सुमारे 300 समुद्री मैलांच्या अंतरावर आहे. त्यामुळे हिंदी महासागरात त्याचे महत्त्व आहे. मालदीववर चीनचे वर्चस्व भारतासाठी डोकेदुखी ठरु शकते. कारण हिंदी महासागरातून व्यापार करण्यासाठी मालदीवच्या क्षेत्रातून जावे लागते.
चीनचे जहाज हेरगिरी करत असल्याने त्याला हिंदी महासागरातील विविध ठिकाणांचा संपूर्ण नकाशा मिळेल. हिंद महासागरातील वेगवेगळ्या हवामानाची परिस्थिती, वेगवेगळ्या वेळी पाण्याची खोली यासोबतच पाण्याखालील क्रियाकलाप देखील पूर्णपणे मॅप केले जातील, ज्याचा वापर ते भारताविरुद्ध युद्धाच्या वेळी करू शकतात. त्यामुळेच भारताचा त्याला विरोध आहे. आता भारत यावर कसा प्रकारे पाऊलं उचलतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.