मेल्यानंतर खांदा कोण देणार? इथं मिळतील 4 खांदे, तिरडी, न्हावी… फक्त बोला, नवं स्टार्टअप.. ‘पोहोचवण्याच्या’ सगळ्याच सुविधा! कोणत्या शहरात सुरू?

| Updated on: Nov 19, 2022 | 3:48 PM

सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट असं या कंपनीचं नाव आहे. ट्रेडफेअरमध्ये कंपनीने देऊ केलेल्या सर्व सुविधांचं प्रदर्शन मांडण्यात आलंय.

मेल्यानंतर खांदा कोण देणार? इथं मिळतील 4 खांदे, तिरडी, न्हावी... फक्त बोला, नवं स्टार्टअप.. पोहोचवण्याच्या सगळ्याच सुविधा! कोणत्या शहरात सुरू?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः केवळ बिझनेस सुरु करायचा म्हणून काहीही सुविधा घेऊन मार्केटमध्ये येणं चालत नाही. त्यासाठी आपण जिथे बिझनेस (Business) करणार आहोत, त्या लोकांची नेमकी गरज काय, तिथल्या समाजाचे प्रश्न नेमके काय आहेत, हे नेमकं हेरणं अपेक्षित असतं. अशीच एक लोकांची गरज हेरून नवं स्टार्ट अप सुरु झालंय. स्टार्टअपने (Startup) देऊ केलेली सुविधा पाहूनच तुफ्फान प्रतिक्रिया उमटत आहेत. इतर देशांत अशा सुविधा आहेत. पण भारतात या क्षेत्रात अद्याप अशा सुविधा कुणीच दिल्या नाहीत, त्यामुळे लोकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. तर या स्टार्टअपचं नाव आहे, फ्यूनरल अँड डेथ सर्व्हिस (Funeral and death).

एखादी व्यक्तीचं निधन झाल्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी या कंपनीतर्फे केली जाईल. मग तिरडी बांधणे, त्यासंबंधीचे सर्व साहित्य आणणे, गुरूजी किंवा न्हाव्याला बोलावणे इत्यादी सगळं काही या पॅकेजमध्ये येतं.

ऐकायला जरा वेगळं वाटेल. पण जापान किंवा युरोपातील इतर देशांमध्ये ही सुविधा सर्रास पुरवली जाते. भारतात नुकतीच याची सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील ट्रेड फेअरमध्ये या अनोख्या स्टार्टअपचा स्टॉल लागला. तेव्हापासून याची जोरदार चर्चा सुरु झाली. प्रदर्शनात तर फुलांनी अंथरलेली तिरडी मांडून ठेवण्यात आली होती. हेच छायाचित्र सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.

सुखांत फ्युनरल मॅनेजमेंट असं या कंपनीचं नाव आहे. ट्रेडफेअरमध्ये कंपनीने देऊ केलेल्या सर्व सुविधांचं प्रदर्शन मांडण्यात आलंय. सजलेली तिरडी, ती उचलण्यासाठी चार खांदे अर्थात चार माणसं, राम नाम सत्य है म्हणणारे लोक, एवढच नाही तर अस्थि विसर्जन करण्याची सुविधाही कंपनीतर्फे दिली जाईल. या संपूर्ण पॅकेजची किंमत 37,500 रुपये एवढी आहे.

सोशल मीडियावर दिल्लीच्या ट्रेड फेअरमधील फोटो खूप व्हायरल होत आहेत. कुणी म्हणतंय, मेल्यानंतरची मॅनेजमेंट कंपनी, असं म्हणावं लागेल. तर कुणी म्हणतंय… देवा.. आता हेच पाहणं बाकी होतं…

विभक्त किंवा एकल कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या लोकांसाठी हे स्टार्टअप महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तसेच कोरोनासारख्या आपत्तींमध्येही अनेकांना अशा एखाद्या सुविधेची नितांत गरज भासली असेल. हीच गरज ओळखून सुखांत फ्यूनरल मॅनेजमेंट सुरू करण्यात आली आहे.

सुखांत फ्यूनरल मॅनेजमेंटचे डायरेक्टर आणि सहसंस्थापक संजय रामगुडे यांनी टीव्ही9 शी बातचित केली. ते म्हणाले, आम्ही अंत्यसंस्कारांची पूर्ण प्लॅनिंग करतो. आतापर्यंत जवळपास 5000 लोकांना ही सुविधा दिली आहे. सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ही सुविधा उपलब्ध आहे. लवकरच भारतातील सर्वच शहरांमध्ये शाखा उघडण्याच्या तयारीत आहोत.

लोकांना फ्रेंचायझी देण्याचा आमचा विचार आहे. इमर्जन्सी अंत्यसंस्कार केले तर 8 ते 12 हजार खर्च येतो. पण पूर्ण विधिवत अंत्यसंस्कार करायचे झाल्यास हा खर्च 40 हजार रुपयांपर्यंत जातो, अशी माहिती संजय रामगुडे यांनी दिली.