सुखोई-मिराज धडकले, अपघात 1 , घटनास्थळं 2, एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 28, 2023 | 5:44 PM

सुखोई विमान राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील पिंगोरी येथे कोसळलं तर घटनास्थळापासून 90 किमी अंतरावर पायलट कोसळले. हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सुखोई-मिराज धडकले, अपघात 1 , घटनास्थळं 2, एकाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाची (Indian Airforce) दोन विमानं आज आकाशात एकमेकांवर आदळली (Plane crash). या भीषण अपघातात एका पायलटचा मृत्यू झाला. सुखोई 30 आणि मिराज 2000 विमानांचा एवढ्या भीषणतेने अपघात नेमका का झाला, असा प्रश्न सर्वांना पडलाय. मध्य प्रदेशातील मुरैना (Muraina) जिल्ह्यात ही घटना घडली. सुखोई विमानात दोन पायलट होते तर मिराज विमानात एक जण होता. सुखोईतील दोन्ही पायलट पॅरेशूटद्वारे जमिनीवर आले, पण मिराज विमानातील पायलटचा मृत्यू झाला. बचावलेले पायलट गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

का घडला अपघात?

सुखोई आणि मिराज या दोन्ही लढाऊ विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केलं होतं. नियमित प्रशिक्षणादरम्यान हे उड्डाण करण्यात आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही विमानांची आकाशत धडक झाली. मध्य प्रदेशातील मुरैना येथील पहाडगढच्या जंगलात मिराज विमान कोसळलं.
अपघाताने आगीचा भडका उडून विमान कोसळलं. यातील पायलटचा मृत्यू झाला. या घटनास्थळाचा व्हिडिओही समोर आलाय.

तर मिराज विमानाशी धडक बसल्याने सुखोईला आग लागली नाही. पण त्याचे पंख तुटले. विमान अपघाताचे संकेत मिळताच दोन्ही पायलट्सनी पॅरेशूटच्या मदतीने जमिनीच्या दिशेने झेप घेतली.

सुखोई विमान राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील पिंगोरी येथे कोसळलं तर घटनास्थळापासून 90 किमी अंतरावर पायलट कोसळले. हे दोघेही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

दोन घटना असल्याचा संभ्रम

आज सकाळी विमान दुर्घटनेची माहिती समोर आली तेव्हा हे दोन अपघात असल्याचा संभ्रम निर्माण झाला. सुरुवातीला मध्य प्रदेशातल्या मुरैना येथे दोन विमानांची धडक झाल्याचं म्हटलं गेलं. तर राजस्थानमध्ये चार्टर्ड प्लेनचा अपघात झाल्याचं म्हटलं गेलं. मात्र काही वेळातच हवाई दलाकडून हा संभ्रम दूर करण्यात आला.  या अपघाताचं नेमकं कारण काय, याची चौकशी सुरु आहे.