हिंदुहृदयसम्राट…!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

अंकिता शिंदे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजेच शिवसेना, हे जणू समीकरणच.  म्हणूनच बाळासाहेब भाषणाला उठले की जयघोष व्हायचा. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवातच व्हायची ती… ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..’ हे खणखणीत उद्गार होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. मराठी माणसाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपत […]

हिंदुहृदयसम्राट...!
Follow us on

अंकिता शिंदे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजेच शिवसेना, हे जणू समीकरणच.  म्हणूनच बाळासाहेब भाषणाला उठले की जयघोष व्हायचा. बाळासाहेबांच्या भाषणाची सुरुवातच व्हायची ती… ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..’ हे खणखणीत उद्गार होते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे.

मराठी माणसाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपत ठेवणारे बाळासाहेब. मराठी जनतेच्या मनावर आदरणीय स्थान प्राप्त करणारे हिंदुहृदयसम्राट. मराठी माणसाच्या मनात मराठीपणाचा अभिमान रुजवणारे बाळासाहेब. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांना हा वसा अविरतपणे चालवला आणि पार पाडला.

बाळासाहेबांनी कारकीर्दीची सुरुवात केली ती व्यंगचित्रकार म्हणून. पण त्यांना विचारांचा वारसा लाभला होता तो वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून. मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई बाळासाहेबांनी सुरु केली. मार्मिकमधून मराठी माणसाची लढाई सुरु झाली. ‘वाचा आणि थंड बसा’ या शिर्षकाखाली मराठी माणसाला पेटवण्यात बाळासाहेबांना यश आलं. मराठी माणसाच्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली. मराठी मुलांना 80 टक्के नोकऱ्या मिळण्यासाठी आंदोलन पेटलं. दादरच्या रानडे रोडच्या एका इमारतीत संघटनेचा नारळ वाढवला गेला आणि 19 जून 1966 रोजी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला.

बाळ ठाकरेंना उभा महाराष्ट्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावानं ओळखू लागला. मुंबई आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चारच महिन्यात शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्यात पाच लाखांची गर्दी जमली. खुद्द शरद पवारही त्या सभेला उपस्थित होते. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मान्यतेवर तेव्हाच शिक्कामोर्तब झालं. तेव्हापासून महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हेच समीकरण राहिलं. ते त्यांच्या हयातीपर्यंत कायम राहिलं.

बाळासाहेब आज हयात नसले तरी मराठी माणसाच्या हक्कासाठी आजही शिवसेना लढतेय. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण हा बाळासाहेबांनी दिलेला वसा घेऊन.. शिवसेना आणि बाळासाहेब हे समीकरण नेहमीच कायम राहिल.. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं  मराठी माणसाच्या हृदयातील स्थान नेहमीच अढळ राहणार आहे..

-अंकिता शिंदे, टीव्ही 9 मराठी, मुंबई

(लेखात व्यक्त केलेली मतं वैयक्तिक आहेत)