ऑपरेशन चारापाणी… हतबल शेतकऱ्यांची कहाणी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

महाराष्ट्र राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि या दुष्काळाला सामोरे जाताना राज्य सरकारने जनावरांना याचा फटका बसू नये म्हणून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यातील परिस्थिती नेमकी काय आहे? सरकार सांगत असलेली उपाय योजना छावण्यात होतात का? हे पाहण्यासाठी मी काही चारा छावण्यांमध्ये गेलो होतो. त्याच अनुभवावर ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट ‘ऑपरेशन चारापाणी’ […]

ऑपरेशन चारापाणी... हतबल शेतकऱ्यांची कहाणी
Follow us on

महाराष्ट्र राज्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि या दुष्काळाला सामोरे जाताना राज्य सरकारने जनावरांना याचा फटका बसू नये म्हणून चारा छावण्या सुरू केल्या आहेत. या छावण्यातील परिस्थिती नेमकी काय आहे? सरकार सांगत असलेली उपाय योजना छावण्यात होतात का? हे पाहण्यासाठी मी काही चारा छावण्यांमध्ये गेलो होतो. त्याच अनुभवावर ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट ‘ऑपरेशन चारापाणी’ बनवला आहे.

चारा छावण्यांमधील जनावरांची परवड सुरू आहे. शासकीय नियम धाब्यावर बसवत छावणी चालकांची मनमानी सुरू आहे.

राज्यात सध्या सुरू असलेल्या छावण्यांमध्ये सात लाख जनावरे आश्रयाला आहेत. या जनावरांचे हाल सुरू आहेत कुठे वाळलेला ऊस दिला जातो तर कुठे भुस्कट म्हणूनच नुसत्या काड्या दिल्या जातात. विशेष म्हणजे वेळेवर पाणीही दिले जाते नाही. तरी छावणीत असलेले शेतकरी गपगुमान सगळे सहन करत आहेत. छावणी चालक स्थानिक राजकीय पुढारी आहेत. त्यांची दादागिरी चालते. त्यामुळे संचालकाच्या दबावाला बळी पडून शेतकरी तक्रार नाहीत.

महाराष्ट्र राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा तब्बल 45 टक्के भूभागात सद्या दुष्काळ आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा आणि पाणी यांचे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळेच 24 जानेवारी 2019 रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने राज्यात चारा छावण्या उघडण्याचा निर्णय घेतला.

चारा छावणी संचालकांच्या दहशतीमुळे कोणताच शेतकरी बोलायला तयार नाही. मी वारंवार शेतकऱ्यांना विनंती केली तुमच्या काय व्याथा आहेत त्या सांगा. आम्ही तक्रार केली तर आम्हाला सगळ्यांना फोन लावला जाईल या भीतीपोटी कोणता शेतकरी बोलायला तयार नव्हता. त्यामुळे नाईलाजाणे स्टिंग करावे लागले. या छावण्यांमध्ये काय सुरु आहे पहा तुम्हीच…

स्थळ – चारा छावणी, शिवदरा रोड, पालवन शिवार, ता जी बीड

1) शेतकरी : ज्ञानेश्वर घोलप व इतर

रिपोर्टर – यांना काय पेंड बिंड ?

शेतकरी – ( नाही म्हणत मान हलवत)  नाही

रिपोर्टर – सुग्रास किंवा पेंड किती देतात ?

शेतकरी – नाही देत

रिपोर्टर – देत नाहीत ?

शेतकरी – तीन महिन्यातून दोनदा दिली आहे ….आता चौथा महिना आहे…

रिपोर्टर – तुम्ही काही सांगत नाही का सरकारी अधिकाऱ्यांना ? अधिकारी येत नाहीत का बघायला ?

शेतकरी – कशाला अधिकारी येतेय… त्याला भेटल असेल काय तर….

रिपोर्टर – मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेली छावणी आहे ही.

शेतकरी- कसलं येतीती?

रिपोर्टर – तुम्ही तक्रार करत नाही का ?

शेतकरी – कुणाकडे करायची तक्रार ?

रिपोर्टर – सरकारी अधिकाऱ्याकडे बीडीओ, तहसीलदार, कृषी अधिकारी….

शेतकरी – नाही कुणी येत नाही आता आज पर्यंत जनावर बघायला पण आली नाहीत.

2) घोलप, शेतकरी

रिपोर्टर – काय नाव तुमचं ?

शेतकरी – घोलप

रिपोर्टर – किती किलो चारा दिला एका जनावराला ?

शेतकरी – 15 किलो

रिपोर्टर – पेंढ बिंड काय ?

शेतकरी – नसती सुग्रास देतेती

रिपोर्टर – किती ?

शेतकरी – 1किलो ते बी दहा पंधरा दिवसातून ना एकदा….

रिपोर्टर – दहा पंधरा दिवसात एकदा किलो…..

शेतकरी – ते पण महिन्यातून एकदा….

रिपोर्टर – तुम्ही मागणी करत नाही का ?

शेतकरी – मागणी तर कुणाला करायची ?

रिपोर्टर – सरकारी अधिकारी येत नाहीत का ?

शेतकरी – सरकारी अधिकारी अंधारातून पाकीट गेल्यावर कशाला येते ती रिपोर्टर शेतकरी अधिकारी दिसला नाही अजून आलेला

आम्ही स्टिंग केलेली चारा छावणी ही चारा छावणी याअंतर्गत परवानगी नसून राहत शिबीर अशी मंजुरी आहे.

म्हणजेच यास राज्य शासनाचा विशेष निधी आहे. हे चारा शिबीर गरज असेपर्यंत सुरू राहणार आहे. या चारा शिबिराचे मालक राजेंद्र मस्के हे असून यांच्या पत्नी बीड जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. त्यांच्या विरोधात तर कोण बोलणार ? कारण ते मुख्यमंत्र्यांच्या खास जवळचे आणि त्यांचा बोलबाला सगळीकडेच.  यामुळे शेतकरी गपगुमान सगळ्या सहन करत होते.

तुम्हीच पहा…

शेतकरी, दीपक बेंद्रे

रिपोर्टर – ऊसाचा दुधावर काय परिणाम ?

शेतकरी – होतंय की , कमी देतेती

रिपोर्टर – दूध कमी देतेत

शेतकरी – कमी देतात, दुधाचा वास येतंय, दूध फुटतय, नसतय… वाळलेला चारा दिला तर बर आहे… त्यामुळे जरी छावणीत असलो तरी विकत आणावा लागतो चारा

रिपोर्टर – ह्याला काय सावली केली नाही ?

शेतकरी – फाटलय वाऱ्याने

रिपोर्टेर – छावणी मालकांना करून द्यायचे असते ना !

शेतकरी – छावणी मालकाने काही केले नाही. स्वतः शेतकरी करतेत

रिपोर्टर – सुका चारा काय ?

शेतकरी – सुका चारा काय तिथे आहे नुसता काड्या आहेत…. एका दिवसाला सहा किलो…

रिपोर्टेर – एका दिवसाला सहा किलो …..

शेतकरी – एका दिवसाला सहा किलो ….. त्याच्या टोपली पण भरत नाही

रिपोर्टर – किती दिवसाला ?

शेतकरी – ज्या दिवशी ऊस नसेल त्या दिवशी देणार

रिपोर्टर – पेंड सुग्रास काय ?

शेतकरी – काहीच नाही… आम्हाला छावण्यात आल्यापासून दोनदा मिळाले आहे.…. तीन महिने झाले ते बी एक किलो….

रिपोर्टर – ऊसाचा काय त्रास झाला का जबड्याला ?

शेतकरी – होतय ना आपल्याला आपलं तोंड आल्यावर कसं होतं तसं फोड आलेत

रिपोर्टर – मशीन असून हाताने का तोडतोय ?

शेतकरी – लाईट नाही ना सकाळ पासून काय करणार मग ?

रिपोर्टर – जबडा दाखवा

शेतकरी – आपल तोंड आल्यावर कसं फोड येतेत तस झाले

रिपोर्टर – फोड आलेत की लका…

शेतकरी – जवळ या काहीच करणार नाही…कंटिन्यू तेच खाणार म्हणल्यावर फोड येणार नाही तर काय होईल ?

रिपोर्टर – आलटून-पालटून कडबा नाही, पेंड नाही, सुग्रास नाही ?

शेतकरी – काहीच नाही

रिपोर्टर – सरकारी अधिकारी वगैरे कोणी आलं का

शेतकरी – नाही अजून तर कोणीच आलं नाही… पहिलीबार तुम्ही आलाव… ही छावणी म्हणजे जिल्हा परिषद अध्यक्षांची….त्यांच्या पदाची दहशत असल्यामुळे लोक बोलत नाहीत…. आम्ही बोलू शकत नाही

रिपोर्टर – दहशत आहे त्यांची ?

शेतकरी – लोकांना वाटते दुष्काळात देते ते घ्यावं गप्प.. दहशत निर्माण करतात

हताशपणे मी पुढच्या शेतकऱ्याशी बोलायला निघालो……….

रिपोर्टर – सुग्रास पेंड काय देतात का ?

शेतकरी – महिन्यातून एकदा एकदाच येते

रिपोर्टर – महिन्यात एक बार !

शेतकरी – रोज द्यायचा निर्णय आहे पण देत नाहीती…आता काय करणार ? शेतकऱ्यांना वाटते देते ती तेवढे बघा…. त्यातच समाधान आहे… कुठे तक्रार करत बसायची ?

रिपोर्टर – जनावरांना काय होत नाही का जबड्याला ?

शेतकरी – होतं पण काय आता इलाज नाही…. त्यामुळे बारीक करावे लागते

रिपोर्टर –  म्हणून तर याबरोबर  सरकारने पेंड सुग्रास वगैरे द्यायचे ठरवले

शेतकरी – काय देत नाहीती..

रिपोर्टर – सुग्रास वगैरे काय ?

शेतकरी – कधी तर महिन्यातून एकदा अर्धा किलो देतेती….

शेतकरी असे सांगत असताना आम्ही पोहोचलो छावणी व्यवस्थापकांकडे. आमची गाडी आणि आमचा अवतार पाहून व्यवस्थापकांना वाटलं कोणीतरी सरकारी अधिकारी आहोत. मी त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एखाद्या रुळलेल्या किंवा कसलेल्या पैलवान प्रमाणे व्यवस्थापकाने मला शिस्तीत उत्तरे दिली

व्यवस्थापक काय म्हणतात ते पाहा..

रिपोर्टर – साधारणपणे साडेचार हजार जनावरे आहेत काय….तुम्ही काय मॅनेजर का ?

व्यवस्थापक – हो

रिपोर्टर – काय नाव ?

व्यवस्थापक – प्रल्हाद चित्रे

रिपोर्टर – ऊस किती दिवस झाले टाकलाय ?

व्यवस्थापक – काल आणलाय

रिपोर्टर – किती वळलाय आहे !

व्यवस्थापक – ऊन कसलं भयानक आहे

रिपोर्टर – एका जनावरला किती चारा देता ?

व्यवस्थापक – पंधरा किलो

रिपोर्टर – पेंड बींड ?

व्यवस्थापक – एक दिवस आड एक किलो

रिपोर्टर – बारक्याला ?

व्यवस्थापक – अर्धा किलो

बघा …छावणी व्यवस्थापक सांगतात एक दिवस आड एक किलो आणि शेतकरी सांगतात तीन महिने झालेत दिलीच नाही…. मुक्या जनावरांचा चारा खाते कोण ? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.

शेतकरी भीतीपोटी तक्रार करत नाही कारण त्याला उद्याचं मरण डोळ्यासमोर दिसतय. सखाराम केली आणि छावणी मालकाने हाकलून दिले तर जाणार कोणाकडे ?

चारा छावण्यांच्या कारभारामध्येअसं सगळं असताना या छावणीकडे दुर्लक्ष का केले जाते हा खरा कळीचा मुद्दा आहे. यानंतर आम्ही पोचलो तिथून पुढे दुसर्‍या चारा छावणीत. सुरुवातीलाच आमची गाडी बघून शेतक-यांना वाटले सरकारी अधिकारी चौकशीला आहे. त्यामुळे  संचालकच आमच्या स्वागताला आले. संचालक सोबत असल्यामुळे शेतकरी काही बोलायला तयार नाही शेवटी मी छावणी संचालकाला त्यांच्या कार्यालयात सोडलं. मी एकटाच गुपचूप छावणीत घुसलो.

राज्यात दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत. एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण करावी लागत आहे तर दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे चारा छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच मुळे चारा छावण्यांचे काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी गेल्यानंतर त्यातलं भयानक वास्तव आला समोर.

शेतकरी, बागलाण, तळेगाव , ता, जी बीड

रिपोर्टर – पार वाळून गेला की ऊस

शेतकरी – वाळलेला अंतीते

रिपोर्टर – सुग्रास ?

शेतकरी – सुग्रास देत नाहीती…. चौकशी करा बघा…

रिपोर्टर – सुग्रास कधी दिला होता ?

शेतकरी – दिलाच नाही…. देत नाहीती

रिपोर्टर – कोण आहे छावणी मालक ?

शेतकरी – ढामकर…

सुनिता बागलाणी, तळेगाव , ता, जी बीड

रिपोर्टर – काय काय देतेती

शेतकरी महिला – ऊस भुस्कट

रिपोर्ट – हिरवा आहे का ?

शेतकरी महिला – दुष्काळात कुठला हिरवा मिळणार ?

रिपोर्टर – सुग्रास देतेती का ?

शेतकरी महिला – नाही वाटतं सुग्रास

3) बागलानी, तळेगाव, ता, जी बीड

रिपोर्टर – नियमाने तुम्हाला हवाय की

शेतकरी – मिळत नसल्याचे हातवारे करत आहे…कारण छावणी मालक सोबत

रिपोर्टर – सुग्रास मिळत नाही ?

शेतकरी – मिळत नाही हातवारे करून छावणी मालकासारखा आम्हाला बोलावं लागतं कोणी अधिकारी आला की….

रिपोर्टर – मी विद्यार्थी आहे

भीमराव घोलप, तळेगा, जि. बीड

रिपोर्टर – ऊसाने काय होत नाही का ?

शेतकरी – होते पण आता नाविलाज आहे

रिपोर्टर – सुग्रास पेंड काय…

शेतकरी – काही नाही एक छटाक पण नाही

रिपोर्ट – शासन पैसे देते की

शेतकरी – देते पण इकडे देत नाहीती

रिपोर्टर – एकदा पण दिले नाही का ?

शेतकरी – त्यांनाच विचारा ते आले

रिपोर्टर – घाबरू नका

शेतकरी – पाणी नाही सकाळपासून सगळ्या टाक्या रिकाम्या आहेत….. काल सकाळपासून पाणी नाही

रिपोर्टर – काल सकाळपासून पाणी नाही….

छावणी चालकांच्या दबावात  राहणारे शेतकरी आहेत हे स्पष्ट होते….

40 45 डिग्री टेंपरेचर मध्ये रणरणत्या उन्हात हतबलपणे शेतकऱ्यांनी उभारलेल्या निवारा खाली गप गुमान मुकी जितराब माझ्याकडे बघत होती तेव्हा मला माझीच लाज वाटली. वाढत ऊन बघून दिवसभरात पाच ते सहा पाणी बॉटल संपल्या असल्याचं माझ्या लक्षात आलं.

सकाळपासून पाणी नाही पाण्याचे ड्रम रिकामे आहेत. हे रिकाम्या ड्रम हलवत एका शेतकरी शाळकरी पोराने मला सांगितलं. मी छावणी संचालकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं, ” साहेब काय करणार दिवसभर झालं लाईटच नाही ! ” लाईट नाही हे वास्तव होतं… पण लाईट नसल्यामुळे पाणी नाही आणि पाण्यामुळे दिवसभरापासून मुकी जनावर तहानलेली ठेवून याचे समर्थन कसे करता येईल ?

दुष्काळ आणि चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे मात्र पाणी पळाले आहे. दुधाचे उत्पादन घटले आहे. जनावरांचे बाजार पडले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका दुष्काळी शेतकऱ्यांना जाणवत आहे. सगळे राजकीय नेते राजकारण करण्यात व्यस्त आहे. आणि दुष्काळी छावण्यावर खपाटीला गेलेले पोट घेऊन आभाळाकडे टक लावत छावणी संचालक जेवढा चारा दिल तेवढं गपगुमान घेत शेतकरी दिवस ढकलत आहेत. अगतिकता आणि हतबलता यापेक्षा दुसरी काय असते…..

दबंगगिरी करत शेतकऱ्यांना व त्यांच्या जनावरांना चाऱ्यापासून वंचित ठेवणाऱ्या छावणी संचालकांना नेमके सरकारने नियम कोणते घालून दिले हे पहा….

25 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त भागात जनावरांच्या छावण्या सुरु करण्यासाठी खालील अटी आणि शर्ती घालण्यात आलेले आहेत

1) संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यकता असलेल्या ठिकाणी महसूल मंडळ स्तरावर जनावरांच्या छावण्या सुरू करण्याची कारवाई करावी

2) प्रत्येक जनावराच्या मालकास त्याच्याकडे असलेल्या एकूण मोठ्या व लहान जनावर यापैकी केवळ पाच जनावरे छावणीत दाखल करता येतील

3) छावणीत दाखल असलेल्या प्रती मोठ्या जनावरास प्रतिदिन 70 रुपये व लहान जनावर प्रतिदिन 75 रुपये अनुदान देय असेल

4) संबंधित छावणी चालकाने शासनाने छावण्या उघडे घेतलेल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे 100 रुपयांचा मुद्रांक पेपरवर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे बंद पत्र सादर करणे बंधनकारक राहील

5) छावणीत दाखल झालेल्या प्रत्येक मोठ्या जनावरांना प्रतिदिन दिन हिरवा चारा उसाचे वाढे किंवा ऊस 15 किलो तर लहान जनावरास साडेसात किलो व पशुखाद्य आठवड्यातून तीन दिवस एक दिवसाआड एक किलो देण्यात यावे

राज्यात सध्या छावण्या किती?

आतापर्यंत अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद, जालना या नऊ जिल्ह्यात १०८४ छावण्या सुरू

मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक आहे. संपूर्ण मराठवाड्यात 664 छावण्या सुरू आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात 590 छावण्या सुरू आहेत.  या सर्व ठिकाणी सध्या 7 लाख 14 हजार 637 जनावरे आश्रयाला

बीड जिल्ह्यातील चारा छावण्यांमध्ये सुरू असलेला सावळागोंधळ आणि या गोंधळावर प्रशासन नेमका करतोय काय यासाठी आम्ही थेट घाटलं जिल्हाधिकारी यांचे कार्यालय. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे म्हणाले, ” तक्रारी आल्यानंतर 323 छावणी चालकांना नोटिसा पाठवलेले आहेत. यापुढे तक्रार आल्यास त्यांच्यावर बरखास्तीची कारवाई करू,”

कुमार पांडे एक महिन्यापूर्वी बीडमध्ये दाखल झाले आहेत. कदाचित त्यामुळे त्यांना बीड बद्दल अधिक माहिती नसेल म्हणून मी त्यांना विनंती केली की लोक इथल्या दहशतीला घाबरून कोणी विरोधात तुमच्याकडे तक्रार करेल का नाही माहिती नाही आपणच आपल्या परीने यांचा साक्षमोक्ष लावावा.

चारा छावणी मालकांच्या मनमानी कारभारामुळे दुष्काळात शेतकरी दुहेरी संकटाला देत तोंड देत आहे. आता या मुक्या जित्राबांच्या हाका राज्य शासन ऐकणार का? आणि आज छावणी संचालकांवरती कारवाई करणार का? हे पाहावे लागेल.

आपल्याला तहान लागली की भूक लागली आहे हे या मुक्या जनावरांना सांगता येत नाही आणि परिस्थितीपुढे हतबल झालेल्या शेतकऱ्यांसमोर दबंगगिरी करत छावणी चालक मनमानीपणे कारभार करत आहेत. प्रशासन या कारभाराला आळा घालता की छावणी चालकांना समोर लोटांगण, हा काळच सांगेल.

स्पेशल रिपोर्ट :