या वेदनेचा अंत कधी?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली नक्षली हल्ल्याच्या बातम्या करतो आहे. या हल्ल्यातील जवळपास सर्वच शहिदांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अनेकांच्या घरातला एकमेव कमावता आधार गेलाय. ३ महिने, सव्वा वर्ष, ४ वर्षांच्या चिमुकल्यांचा बाप या हल्ल्यानं हिरावून घेतला. एका जवानाची पत्नी तर ४ महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या पोटातल्या बाळाचं जन्माआधीच पितृछत्र हरवलं आहे. एक जवानाच्या घरी […]

या वेदनेचा अंत कधी?
Follow us on

गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली नक्षली हल्ल्याच्या बातम्या करतो आहे. या हल्ल्यातील जवळपास सर्वच शहिदांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. अनेकांच्या घरातला एकमेव कमावता आधार गेलाय. ३ महिने, सव्वा वर्ष, ४ वर्षांच्या चिमुकल्यांचा बाप या हल्ल्यानं हिरावून घेतला. एका जवानाची पत्नी तर ४ महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या पोटातल्या बाळाचं जन्माआधीच पितृछत्र हरवलं आहे. एक जवानाच्या घरी त्याच्या जन्मदिनाची तयारी झाली होती. आणि त्याच्या जन्मदिनीच घरात त्याचं पार्थिव आलं.. विधवा बहीण, पॅरेलेसिस झालेला लहान भाऊ, म्हातारे आई-वडील, पत्नी, लहान मुलं अशा अनेक जबाबदाऱ्यांचा भार वाहणारा कुटुंबाचा आधार या हल्ल्याने काढून घेतला… मुलाच्या आठवणीत रडणारी आई, भाऊ गेल्याच्या बातमीनं जीवांचा आकांत करणारे भाऊ-बहीण, पायात डोकं टाकून रडणारा म्हातारा बाप.. ही दृश्यं पाहता हृदय पिळवटून जातं.. तिकडे गडचिरोलीच्या पोलीस मुख्यालयात शहिदांना मानवंदना दिली जात असतांना वीरपत्नीचा आक्रोश मन हेलावून टाकत होता..

महाराष्ट्र पोलीस दलातीत हे १५ वीर जवान नक्षलवादाशी लढताना देशासाठी शहीद झाले.. यातील अनेकांनी विपरीत परिस्थितीशी दोन हात करत आपलं कुटुंब सावरलं होतं.. पण आज त्यांच्या अवेळी जाण्यानं ही कुटुंब निराधार झाली आहेत.. सरकार आर्थिक मदत करेल.. पण, जो हक्काचा  माणूस गमावला तो कधीच परत येणार नाही.. हे दु:ख ज्याच्या वाटेला आलं त्यालाच कळू शकतं.. तुम्ही-आम्ही केवळ क्षणिक भाऊक होऊ, श्रद्धांजली वाहू.. पण यांचे डोळे मात्र जेव्हा जेव्हा आठवण येईल तेव्हा तेव्हा पाणावतील..  म्हणून या दु:खाचं औषध सध्या तरी कुणाकडेच नाही..

सीमेवर लढणारा जवान आणि देशात नक्षलवाद्यांशी लढणारे हे आपले महाराष्ट्र पोलीस हे माझ्यालेखी सारखेच आहेत.. त्यामुळे आता ज्याप्रमाणे आपण दहशतवाद्यांविरोधात धडक मोहीम राबवतो अगदी तशीच कारवाई नक्षलवाद्यांविरोधातही सुरू करायला हवी.. गरिबांची मुलं मारून हक्काच्या बाता करणारा नक्षलवादी चळवळीचा बिमोड व्हायलाच हवा.. कारण पुन्हा पुन्हा एकाच वेळी अनेक शहीदांच्या कुटुंबियांचा हा आक्रोश आपली हतबलता दाखवतो.. त्यामुळे, वेळीच नक्षलवाद्यांना त्यांची घोडचूक दाखवून देणं गरजेचं आहे..