BLOG : परतीचा पाऊस, शेतकरी आणि सत्तासंघर्ष

| Updated on: Nov 02, 2019 | 9:42 AM

गुरुवारी गावी येताना गाडीत एक वयस्कर बाबा भेटलेले. हाताला  बँडेज गुंडाळलेले होतं. सहप्रवाशासोबत त्यांच्या बोलण्यातून ते शेतकरी असल्याचं समजलं. शेतात काम करताना गाईने धडक दिल्यानं मनगटाजवळ त्यांचा हात मोडलेला.

BLOG : परतीचा पाऊस, शेतकरी आणि सत्तासंघर्ष
Follow us on

मुसळधार पाऊस आणि आसमंती दाटलेला काळोख, शेतात सर्वदूर कुजलेली पिकं, कोंब फुटलेला मका, बाजरी,ज्वारी, सोयाबीन, केळी…शेतात होतं ते सारं परतीच्या पावसानं (crop damages due to unseasonal rains) हिरावून घेतलं. घरी खायला धान्य नाही, ना दोन पैसे हातात द्यायला नगदी पिकांचं उत्पन्न. परतीच्या पावसानं (crop damages due to unseasonal rains) पिकं वाया गेली आणि शेतकरी देशोधडीला लागला. पण आता त्या शेतकऱ्याचे अश्रूही दिसू नये आणि त्याच्या हाकाही कानी येऊ नये, म्हणून पुन्हा  मेघगर्जनेसह पाऊस कोसळतोय.

गुरुवारी गावी येताना गाडीत एक वयस्कर बाबा भेटलेले. हाताला  बँडेज गुंडाळलेले होतं. सहप्रवाशासोबत त्यांच्या बोलण्यातून ते शेतकरी असल्याचं समजलं. शेतात काम करताना गाईने धडक दिल्यानं मनगटाजवळ त्यांचा हात मोडलेला. पण बाबा केवळ प्लास्टरसाठी मुंबईला चकरा मारत होते. आता तर,प्लास्टरनंतरही त्याचा हात ठिक झाला नव्हता. समोरचा तरुण बाबांना सांगत होता, 2 हजार रुपये खर्च केले असते तर गावातच प्लास्टर झालं असतं. हात चांगला झाला असता. त्याचं बोलणं योग्य होतं, पण बाबाच्या उत्तरानं निशब्द झालो.

‘पावसामुळे पिकं वाया गेली, हातात पैसे नाहीत. 2 हजार आणायचे कुठून? गावात सगळ्यांचं नुकसान झालं. कुणाकडे पैसे मागायचे.” हे सर्व बोलताना त्या म्हाताऱ्या शेतकऱ्याचे डोळे पाणावले होते. खाली बसलेले बाबा मोडलेला हात चादरीत गुंडाळत, राज्यातल्या शेतकऱ्याची कहाणी सांगत होते.

विशेष म्हणजे हे बाबा आमच्या तालुक्याच्या आमदारांच्याच  गावचे होते. आता यात आमदाराचा दोष आहे का? तर बिलकुल नाही. पण शेतकरी त्रस्त झालाय एवढं मात्र यातून स्पष्ट होतं. सत्ताधारी त्यांच्यासाठी काही करतील किंवा विरोधक त्यांच्यासाठी लढतील यावर शेतकऱ्यांचा विश्वासच राहिलेला नाही. नाही म्हणायला मीडियावर किमान शेतकरी रागावतो तरी,पण राजकारण्यांकडून मात्र शेतकऱ्याला अपेक्षाच राहिलेली नाही,असं वाटतं.

ही शेतकऱ्याची व्यथा आहे. कधी दुष्काळ तर कधी मुसळधार पाऊस. शेती समोर अनेक संकटं आहेत. अशाही परिस्थितीत शेती जगवणं आणि तुमची आमची भूक भागवण्यासाठी शेतकरी झटत राहतो. पण, त्याच्या संकटात कुणीच वेळेवर मदतीला येत नाही,हेच दिसतं.

ज्यांना कौल दिला त्यांना सत्तासंघर्षातून वेळ मिळत नाही आणि ज्याच्या भरवशावर मातीत पैसा ओतायचा,दिवस रात्रीची पर्वा न करता राब राब राबायचं तो निसर्गही बेईमान झाला, तर शेतकऱ्याने करावं तरी काय? अस्मानी आणि सुल्तानीच्या कचाट्यात सापडलेला शेतकरी दररोज आत्महत्या करतोय.कोडगी आणि असंवेदनशील झालेल्या जमातीला जेव्हा शेतकऱ्याला त्याग आणि त्याचे दु:ख कळेल,तेव्हा खऱ्या अर्थाने आपला देश शेतीप्रधान होईल आणि शेतकरी समाधानी होईल.

(ब्लॉगमधील मते वैयक्तिक आहेत)