निवडणुकीच्या तोंडावर भाषा बदलली, अशोक चव्हाणांनी हवा ओळखली?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

नांदेड : मोदी लाटेत 2014 ला महाराष्ट्रातून मराठवाड्याने काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून दिले. त्यापैकी एक म्हणजे नांदेडचे खासदार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. नांदेडचा सातबारा आपल्याच नावावर आहे, असं नेहमी सांगणाऱ्या अशोक चव्हाण यांचा निवडणुकीच्या तोंडावर भाषा बदलली आहे. नांदेड ही काय आपली जहागिरी नाही, असं त्यांनी म्हटलंय. नांदेड काय आपली जहागिरी नाही, असं […]

निवडणुकीच्या तोंडावर भाषा बदलली, अशोक चव्हाणांनी हवा ओळखली?
Follow us on

नांदेड : मोदी लाटेत 2014 ला महाराष्ट्रातून मराठवाड्याने काँग्रेसचे फक्त दोन खासदार निवडून दिले. त्यापैकी एक म्हणजे नांदेडचे खासदार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. नांदेडचा सातबारा आपल्याच नावावर आहे, असं नेहमी सांगणाऱ्या अशोक चव्हाण यांचा निवडणुकीच्या तोंडावर भाषा बदलली आहे. नांदेड ही काय आपली जहागिरी नाही, असं त्यांनी म्हटलंय.

नांदेड काय आपली जहागिरी नाही, असं सांगत लोकांच्या प्रेमाखातर आपण निवडणुकीत उभं असल्याचं चव्हाण आता म्हणत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या लिंगायत समाजाच्या मेळाव्यात अशोक चव्हाण बोलत होते. दरम्यान निवडणुकीत अद्याप रंगत येणं बाकी असतानाच चव्हाण यांची भाषा भावनिक झाली आहे. 2014 ला महाराष्ट्रात काँग्रेसचे फक्त दोन उमेदवार निवडून आले होते. त्यामध्ये हिंगोलीतून राजीव सातव आणि नांदेडमधून अशोक चव्हाण यांचा समावेश होता.

राज्यात सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार म्हणून अशोक चव्हाण यावेळी लोकसभा निवडणूक न लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांच्या जागी पत्नी अमित चव्हाण यांची नांदेडमधून चर्चा होती. पण सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने आता अशोक चव्हाण यांनाच निवडणूक लढवण्याचे आदेश दिले आहेत. अशोक चव्हाण यांच्यावर प्रदेशाध्यक्ष या नात्याने राज्याची जबाबदारी आहेच, शिवाय ते स्वतःच्याही प्रचाराला लागले आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या संभाव्य शक्यतांमुळे अशोक चव्हाण विधानसभा निवडणूक लढवू शकतात, असं बोललं जात होतं. राज्यात जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसने अशोक चव्हाण यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली होती.

काँग्रेसकडून राज्यात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जनसंघर्ष यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. पश्चिम महाराष्ट्रातून या यात्रेची सुरुवात झाली. विविध टप्प्यांमध्ये राज्यभरात ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार आली. या यात्रेची जबाबदारी अशोक चव्हाणांकडे देण्यात आली होती.

डिसेंबर 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते. पण आदर्श घोटाळ्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

अशोक चव्हाणांना राजकीय वारसा

स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचे चिरंजीव म्हणून अशोक चव्हाणांना नांदेड जिल्ह्यात मोठा मान आहे. राजकारणातील हेडमास्टर म्हणून स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांची ओळख होती. शंकरराव चव्हाणांचा वारसा अशोक चव्हाणांना लाभला. देशाचे गृहमंत्रीपद भूषविणाऱ्या शंकरराव चव्हाणांनी दिल्लीच्या राजकारणात आपला ठसा उमटविला. अशांत पंजाबात लोकशाहीची पुनर्स्थापना, बाबरी मशिद प्रकरण अशा अत्यंत खडतर काळात त्यांनी देशाचे गृहमंत्रीपद भूषविले. मराठवाड्यातील सिंचनासाठी त्यांनी केलेली कामे आजही लोकांना तोंडपाठ आहेत. उजनी, जायकवाडी, सिद्धेश्वर, येलदरी, इसापूर, विष्णुपुरी प्रकल्प ही शंकरराव चव्हाणांची एक प्रकारे स्मारकेच आहेत.