भविष्यात प्रकाश आंबेडकर भाजपसोबत येतील, बच्चू कडू यांचं मोठं विधान

| Updated on: Jan 28, 2023 | 5:07 PM

शरद पवार काहीही करू शकतात. हातात हात देतात किंवा पायात पाय घालू शकतात, अशी टिप्पणी बच्चू कडू यांनी केली.

भविष्यात प्रकाश आंबेडकर भाजपसोबत येतील, बच्चू कडू यांचं मोठं विधान
Image Credit source: social media
Follow us on

अभिजित पोते, परभणी: प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा भविष्यात एकत्र येऊ शकतात, असं मोठं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी नुकतंच नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या बाजूने वक्तव्य केल्याने ही शक्यताही नाकारता येत नाही, असं बच्चू कडू म्हणालेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची युती झाल्यानंतर राज्यात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा आहे. शिवसेनेसोबत असले तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांची युती होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. तर जागा वाटपावरूनच युतीत मतभेद होण्याची शक्यता राजकीय तज्ञ वर्तवत आहेत. अशा स्थितीत बच्चू कडू यांनी केलेलं वक्तव्य नव्याने चर्चेत आलंय.

बच्चू कडू काय म्हणाले?

पुण्यात माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, प्रकाश आंबेडकरांनी कालच नरेंद्र मोदी यांची स्तुती केली. त्यामुळे भविष्यात प्रकाश आंबेडकर आणि भाजपची युती होईल, असं बच्चू कडू म्हणाले.

प्रकाश आंबेडकर मोदींबद्दल काय म्हणाले?

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ईडी तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नाहीयेत. ते कायद्याच्या कक्षेत राहूनच कारवाई करत आहेत. त्यांच्या जागी मीही असतो तर हेच केलं असतं. कायद्यात राहून आपली खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करणं गैर नाही. यापूर्वीच्या सरकारांनीही हेच केलंय, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय.

आमदारांना आनंदाची झोप…

बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरही भाष्य केलं. शिंदे-फडणवीस सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, असं म्हटलं जातंय. त्यात बच्चू कडू यांना मोठी अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारात त्यांना संधी मिळाली नाही, त्यामुळे मी नाराज नाही, असं स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी दिलं. तर आमदारांना आनंदाची झोप लागली पाहिजे, म्हणूनच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवला जातोय, अशी मिश्कील टिप्पणीही बच्चू कडू यांनी केली.

शरद पवार आहेत ते…

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार होते, अशी चर्चा नव्याने सुरु झाली आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. यावरून बच्चू कडू यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार काहीही करू शकतात. हातात हात देतात किंवा पायात पाय घालू शकतात, अशी टिप्पणी बच्चू कडू यांनी केली.