छत्रपती शिवरायांप्रमाणे एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं… भाजप मंत्र्याचं वक्तव्य! शिवप्रताप दिनालाच नवा वाद!

| Updated on: Nov 30, 2022 | 1:26 PM

राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

छत्रपती शिवरायांप्रमाणे एकनाथ शिंदेंनाही डांबून ठेवलं होतं... भाजप मंत्र्याचं वक्तव्य! शिवप्रताप दिनालाच नवा वाद!
Image Credit source: social media
Follow us on

साताराः राज्याचं लक्ष वेधणाऱ्या शिवप्रताप दिनाच्या (Shivpratapdin) कार्यक्रमातच आज आणखी एक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. बोलणारे नेतेही भाजपचेच आहेत. प्रतापगड किल्ल्यावर आज 363 वा शिवप्रताप दिनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी केंद्रीय पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाशी केली आहे.

या कार्यक्रमात भाषणादरम्यान मंगलप्रभात लोढा म्हणाले, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी ते बाहेर पडले… तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कोणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले.. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.

आधीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी केल्याने महाराष्ट्रातील विरोधी पक्ष पेटून उठले आहेत. भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाल पदावरून हटवण्यात यावे, या मागणीसाठी महाविकास आघाडी तसेच राज्यातील महत्त्वाचे नेते आक्रमक झाले आहेत.

त्यात आता मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच असे वक्तव्य करण्यात आल्याने त्याबद्दल शिंदे काय प्रतिक्रिया देतायत, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.