ठाकरे गटाला झटका! शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल

| Updated on: Oct 11, 2022 | 8:47 PM

ठाकरे गटाच्या एक सोडून तब्बल तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्ंयात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाकरे गटाला झटका! शिवसेना नेते विनायक राऊत, भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल
Follow us on

मुंबई : पक्षाचे नविन नाव आणि मशाल चिन्ह मिळाल्यानंतर ठाकरे गटात आनंदाचे वातावरण होते. त्यातच आता ठाकरे गटाला जबरदस्त झटका देणारी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाच्या एक सोडून तब्बल तीन नेत्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेना नेते विनायक राऊत(Vinayak Raut), भास्कर जाधव(Bhaskar Jadhav) आणि सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्ंयात या तिघांसह एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे हे नेते उपस्थित होते. यावेळी सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती. तर, विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात प्रक्षोभक आणि बदनामी करणारे भाषण केले होते.

या प्रक्षोभक भाषण प्रकरणी  सुषमा अंधारे,आमदार भास्कर जाधव,खासदार विनायक राऊत,धर्मराज्य पक्षचे राजन राजे, माजी नगरसेवक मधुकर देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष अनिता बिर्जे, निवेदक सचीन चव्हाण यांच्यासह सात नेत्यांविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कलम 153,500 आणि 504 तसेच कलम 153 अंतर्गत दोन गटात हाणामारी करण्याच्या उद्देशाने केलेले वक्तव्य केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तर, कलम 500 ,504 अंतर्गत बदनामी केल्याचा गुन्हा या नेत्यांविरोधात दाखल करण्यात आला आहे.