चंद्रकांत पाटलांची पाटीलकी पुन्हा एकदा चर्चेत; कसे झाले ते पाटील?

| Updated on: Oct 15, 2022 | 9:58 PM

आपण पाटील कसे झालो याचा किस्साच चंद्रकांत दादांनी सांगितला.

चंद्रकांत पाटलांची पाटीलकी पुन्हा एकदा चर्चेत; कसे झाले ते पाटील?
Follow us on

मुंबई : माझं आडनाव काय आहे..हे मी माझ्या वडिलांना विचारलं..तर ते म्हणाले आपण जावळीतले मोरे.. मग पाटील कसं झालं..तर आपल्या घरात सातत्यानं पोलीस पाटील राहिलो म्हणून पाटील झालो. या वक्तव्यामुळं भाजप नेते चंद्रकांत पाटलांची पाटीलकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पुणे पोलिसांच्या एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील उपस्थित होते. यावेळी आपण पाटील कसे झालो याचा किस्साच चंद्रकांत दादांनी सांगितला.

कोरोना काळात पुणे पोलिसांनी केलेल्या कामाचं ते कौतुक करत होते.पण, बोलता बोलता चंद्रकांतदादांनी आपलं कुळ आणि मूळ सांगून टाकलं.

कोरोना काळात राज्यात अनेक पोलीस पाटलांनी जीवावर उदार होऊन काम केले. काही पोलीस पाटलांचे प्राणही गेले. याबद्दल बोलताना चंद्रकांतदादांनी आपला भाऊही पोलीस पाटील असल्याचे चंद्रकांत दादांनी सांगून टाकले.

कोल्हापूर जिल्ह्यात खानापूर 2200 लोकसंख्येचं गाव आहे. त्या गावचा पोलीस पाटील माझा सख्खा चुलत भाऊ आहे. माझं आडनाव काय आहे. हे मी माझ्या वडिलांना विचारलं. तर, ते म्हणाले आपण जावळीतले मोरे. पाटील कसं झालं. तर ते म्हणाले आपल्या घरात सातत्यानं पोलीस पाटील राहिलो म्हणून पाटील झाले.

पण, चंद्रकांतदादांनी आपण जावळीचे मोरे असल्याचं का सांगितलं असेल? असा प्रश्न उपस्थित झाला. मराठा आरक्षणावरुन झालेल्या वादावर चंद्रकांतदादांचं हे स्पष्टीकरण तर नसेल ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासंदर्भातली एक ऑड़िओ क्लिप व्हायरल झाली होती. दोघांच्या संभाषणात मराठा मोर्चे, आंदोलनं, आर्थिक व्यवहाराचा संवाद झाला होता. एकूण 27 मिनिटांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या नावांचाही उल्लेख आहे.

या संभाषणात दोघे जण चंद्रकांत दादा असा उल्लेख करतात. त्यापुढे पैशांच्या व्यवहाराचा विषय येतो. पण, हे आरोप चंद्रकांतदादांनी फेटाळून लावले होते. त्यावेळी मराठा मोर्चा समन्वयकांनी चंद्रकांत पाटील मराठा असल्याची व्हॅलिडीटी काय आहे असा सवाल केला होता.

चंद्रकांतदादांच्या पाटील या आडनावावरुन सोशल मिडीयात अनेक तर्कवितर्कांना नेहमीच उधाण येतं. ऑडिओ क्लिपच्या वादानंतर मराठा मोर्चा समन्वयकांनीही यावर सवाल उपस्थित केले होते. कदाचित त्याच आक्षेपांना चंद्रकांत पाटलांनी संधी साधून उत्तर दिलं असावं असे ते म्हणाले.