भगवान गडाचेही दोन मेळावे? पंकजा मुंडेंसमोर नवी अडचण? तिथेही राजीनामा नाट्य!

| Updated on: Sep 28, 2022 | 2:48 PM

पंकजा मुंडेंसमोर हीच मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण पंकजा मुंडे या मराठवाड्यात अत्यंत लोकप्रिय नेत्या असल्याने स्थानिक राजकारण त्यांच्यापुढे फार टिकाणार नाही, असा सूर जास्त मजबुतीने उमटतोय.

भगवान गडाचेही दोन मेळावे? पंकजा मुंडेंसमोर नवी अडचण? तिथेही राजीनामा नाट्य!
Image Credit source: social media
Follow us on

महेंद्र मुधोळकर, बीडः दसऱ्याला राज्यात चार मेळावे महत्त्वाचे होतात. एक शिवाजी पार्कवर. त्याचे यंदा दोन मेळावे होतील. दुसरा नागपूरच्या रेशीम बागेत रास्वसंघाचा. तिसरा नागपूरच्या दीक्षाभूमीवरचा आणि चौथा म्हणजे भगवानगडावरचा. मराठवाड्याच्या दृष्टीनं भगवान गडाच्या मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. शिवसेनेच्या (Shivsena) विभाजनामुळे यंदा मुंबईतच दोन दसरा मेळावे (Dussehra Melava) होतील. तर इकडे बीडच्या भगवान गडावरील मेळावेही दोन होणार, असे संकेत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यासमोर आता नवी अडचण निर्माण झाली आहे. मागील 7 वर्षांपासून पंकजा मुंडे ज्या भगवान भक्तीगडावर मेळावा घेतात, त्याच गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊ, असं आव्हान एका संघटनेने दिलंय. पण याच संघटनेच्या सदस्यांमध्ये मतभेद असून त्यांचे राजीनामा सत्र सुरु झाले आहे.

भगवान बाबांच्या दसरा मेळाव्याबाबत नेमका काय संघर्ष सुरु आहे, हे समजून घेण्याआधी, दोन भगवानगड नेमके काय आहेत ते पाहुयात. बीड आणि नगर जिल्ह्यातील वंजारी समाज, ऊसतोड कामदारांचे श्रद्धापीठ म्हणजे भगवान बाबा. राज्यात 45 मतदार संघांमध्ये बाबांचे भक्त राहतात.

बीडमधील पाटोदा तालुक्यात सावरगाव हे भगवान बाबांचं जन्मगाव. आता हा भगवान भक्तीगड म्हणून ओळखला जातो. नगर जिल्ह्यात पाथर्डी जिथे भगवान बाबा मठाधीश होते. त्यांची ही कर्मभूमीही भगवान गड म्हणून ओळखली जाते.

सध्याचा वाद सुरु आहे तो बीड- पाटोद्यातल्या सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याचा. मागील 7 वर्षांपासून पंकजा मुंडे येथे दसरा मेळावा घेत आहेत.

आता या सावरगाव येथील भगवान गडावरूनही संघर्ष होताना दिसतोय. भगवान बाबांच्या भक्तांमध्ये बहुतांश समाज वंजारी आहे. याच समाजातील एक संघटन आहे जय भगवान महासंघ.

जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी यावर्षी दसरा मेळावा कृती समितीची स्थापना केली आहे. भगवान गडावर राजकीय भाषण नको, ही भूमिका घेत त्यांनी आता सावरगाव येथील भगवान गडाच्या पायथ्याशी दुसरा मेळावा घेण्याचं जाहीर केलंय.

पंकजा मुंडेंसमोर हीच मोठी अडचण निर्माण झाली आहे. पण पंकजा मुंडे या मराठवाड्यात अत्यंत लोकप्रिय नेत्या असल्याने स्थानिक राजकारण त्यांच्यापुढे फार टिकाणार नाही, अशी चिन्ह आहेत.

याचाच परिणाम म्हणजे दसरा मेळावा एकच होईल समाजात फूट पाडण्याचं काम करू नये, अशा भावना समाजातून व्यक्त होतेय. त्यामुळे सानप यांच्यावरच नाराजी दाखवत जय भगवान महासंघाच्या आष्टी येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय.