राजकारणापलिकडचा नात्याचा ओलावा, उद्धव ठाकरे भावाच्या पाठीशी

| Updated on: Aug 21, 2019 | 10:19 PM

राजकीय मतभेद क्षणिक बाजूला ठेवत उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या (Raj and Uddhav Thackeray) पाठीशी उभे राहिलेत. त्यामुळे भूतकाळातील मतभेदांपासून ते कौटुंबीक जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा मिळालाय.

राजकारणापलिकडचा नात्याचा ओलावा, उद्धव ठाकरे भावाच्या पाठीशी
Follow us on

मुंबई : अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशीच्या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील भावबंध (Raj and Uddhav Thackeray) पुन्हा जुळलेत. राजकीय मतभेद क्षणिक बाजूला ठेवत उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या (Raj and Uddhav Thackeray) पाठीशी उभे राहिलेत. त्यामुळे भूतकाळातील मतभेदांपासून ते कौटुंबीक जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा मिळालाय. चौकशीतून काहीही साध्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी राज ठाकरेंची (Raj and Uddhav Thackeray) पाठराखण केली.

2005 ते 2019 या काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील मतभेदांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. राज आणि उद्धव यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते हळहळले होते. तर मराठी माणसाला दु:ख झालं. अगदी बाळासाहेबांपासून ते ठाकरे कुटुंबातील अनेकांनी दोन भावांमधला वाद मिटवण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

राज-उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी मराठी माणसांनी चळवळही सुरु केली. पण सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. पण ठाकरे बंधूंनी राजकारणाव्यतिरक्त जपलेला नात्यातला ओलावा अनेकदा पाहायला मिळाला.

हृदयविकारामुळे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी स्वतः गाडीचं सारथ्य करत ‘मातोश्री’त आणलं. बाळासाहेबांच्या आजारपणात शुश्रूषेसाठी एकत्र आलेले राज-उद्धव अवघ्या महाराष्ट्राने पहिले. कुटुंबातील विवाह सोहळ्यात ते एकत्र वावरले. तर मुलांच्या आजरपणात एकमेकांच्या मदतीलाही धावले. पण दोघांमध्ये राजकीय शत्रूत्व कायम राहिलं.

राजकारणात दोघांनी एकमेकांना पाण्यात पाहिलं. मराठी अस्मितेच्या मुद्यावर राजकारणात राज ठाकरेंना मिळालेलं यश उद्धव ठाकरेंची डोकेदुखी बनली होती. 2008 ते 2012 या काळात राज ठाकरेंनी राजकारणात सोनेरी दिवस पाहिले. पण केंद्रीय राजकारणात नरेंद्र मोदींच्या उदयानंतर महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या राजकारणावर मर्यादा आल्या. एकेकाळी मोदींचे पुरस्कर्ते असलेले राज ठाकरे त्यांचे कट्टर विरोधक बनले, तर उद्धव ठाकरे यांनी परिस्थिती लक्षात घेत मोदींशी जुळवून घेतलं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने शिवसेनेशी युती तोडली. त्यावेळी शिवसेना-मनसे युती होण्याच्या आशा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत पल्लवित झाल्या होत्या. पण उद्धव ठाकरेंनी मोक्याच्या क्षणीच माघार घेतली.

गेल्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंनी शिवसेनेशी युती करण्यासाठी उद्धव ठाकरेंना 7 वेळा फोन केले. पण उद्धव यांनी त्यांना प्रतिसाद देणं टाळलं. तिथेच राज ठाकरेंनी भविष्यात शिवसेनेशी कुठल्याही तडजोडीवर फुली मारण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरेंना त्याचा काडीमात्र फरक पडला नाही. उलट मनसेत निवडून आलेल्या 7 नगरसेवकांपैकी 6 जणांना पक्षातून फोडत राज ठाकरेंना मोठा धक्का दिला आणि आपली महापालिकेतील परंपरागत सत्ता सुरक्षित केली. उद्धव ठाकरे इतक्यावरच थांबले नाहीत. मनसेचा निवडून आलेला एकमेव आमदारही नुकताच फोडला.

आता राज ठाकरेची राजकीय ताकद ओसरली आहे. मोदींचा विरोध करता करता ते विरोधी पक्षांच्या कंपूत सामील झालेत. ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी ते विरोधी पक्षांची मोट बांधत आहेत. अशा वातावरणात ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोहिनूर मिल जमीन व्यवहाराचे जवळपास 15 वर्षे जुने प्रकरणात राज ठाकरेंच्या मागे ईडीची चौकशीचा ससेमिरा लावला गेलाय. राज ठाकरेंवर राजकीय आकसाने कारवाई केली जात असल्याचा आरोप होतोय. अशा अडचणीच्या काळात उद्धव ठाकरेंनी पाठीशी उभं राहणं हे राज ठाकरेंना मानसिक आधार देऊ शकेल. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंमधला राजकारणापलीकडला नात्यातला ओलावा पाहायला मिळाला.

असं म्हणतात, रक्ताच्या नात्याचं ऋण कधीच फेडता येत नाही. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबाबत केलेल्या विधानातून एकाअर्थी ते सिद्ध होतंय. जसं काठीच्या फटक्याने पाण्याच्या प्रवाहाचे दोन भाग करता येत नाहीत, तसं झेंड्याच्या काठीने रक्ताच्या नात्यात फूट पाडता येत नाही हेच खरं.