‘स्वत:च्या गालावर बसलेला मच्छर उडवणारा नाही तर सक्षम मुख्यमंत्री हवा’, शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा

| Updated on: Aug 12, 2022 | 6:28 PM

शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. 'स्वत:च्या गालावर बसलेला मच्छर उडवणारा नाही तर सक्षम हाताचा मुख्यमंत्री हवा', अशी खोचक टीका पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलीय.

स्वत:च्या गालावर बसलेला मच्छर उडवणारा नाही तर सक्षम मुख्यमंत्री हवा, शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख
Image Credit source: Google
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी झालेले शिवसेनेचे नेते सुरुवातीला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) किंवा आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यास कचरत होते. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील अनेक नेते आता थेट ठाकरे पिता-पुत्रांवर तुटून पडताना दिसत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘स्वत:च्या गालावर बसलेला मच्छर उडवणारा नाही तर सक्षम हाताचा मुख्यमंत्री हवा’, अशी खोचक टीका पावसकर यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केलीय.

पावसकर म्हणाले की शिंदे आणि फडणवीस युतीचं सरकार आल्यानंतर आता महाविकास आघाडी विरोधी पक्ष म्हणून सक्षम काम करेल. जयंत पाटील म्हणाले की अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करताना आम्हाला विचारात घेतलं नाही. अशोक चव्हाणही बोलले. नाना टपोले तर स्पष्टच म्हणाले की महाविकास आघाडी अनैसर्गिक आघाडी होती. आता अंबादास दानवे महाविकास आघाडीचे म्हणून काम करतील की फक्त शिवसेनेचे म्हणून? असा सवाल पावसकर यांनी विचारलाय.

‘शिंदे व्हीसीद्वारे नाही तर प्रत्यक्ष काम करतात’

पावसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देते म्हणाले होते, त्यांनी तशी घोषणाच केली होती. पण अजूनही त्यांनी राजीनामा दिला नाही. महाविकास आघाडी सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करु शकणार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करतात. ते घरी बसून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काम न करता प्रत्यक्ष काम करत आहेत, असा टोलाही पावसकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. तसंच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे आता खातेवाटपही लवकरच होईल, असंही पावसकरांनी सांगितलं.

बावनकुळे, शेलारांना शुभेच्छा

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री असताना चांगलं काम केलं आहे. आशिष शेलार हे माझे मित्र आहेत. बावनकुळे आणि शेलार यांना माझ्याकडून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून शुभेच्छा, अशा शब्दात पावसकर यांनी भाजपचे नवनियु्क्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना शुभेच्छा दिल्या.