MLA Santosh Bangar: हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच? तीन प्रसंग काय सांगतात, जाणून घ्या

| Updated on: Jul 06, 2022 | 3:43 PM

माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. पण दहा दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचा झेंडा कवटाळणारे बांगर, अचानक बंडाचं निशाण कसं फडकावू शकतात? या निर्णयाचं उत्तर मतदारांसमोर तरी द्यावंच लागेल.

MLA Santosh Bangar: हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांच्या मनात एक आणि ओठावर दुसरंच? तीन प्रसंग काय सांगतात, जाणून घ्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

हिंगोलीः पडद्यावर अभिनय करणारे कलाकार फिके पडतील, असं नाट्य महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांनी घडवून आणलं. आधी सूरतला आणि नंतर गुवाहटीत पोहोचलेल्या आमदारांच्या बंडखोरीचे (MLA Rebel) किस्सेही रंगतदार आहेत. विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बहुमत चाचणीत सहभागी झाल्यानंतर हळू हळू सर्व आमदार आपापल्या मतदारसंघात पोहोचत आहेत. या सर्वात लक्ष वेधून घेतलेले आमदार म्हणजे हिंगोलीचे संतोष बांगर (Santosh Bangar). कळमनुरी मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले. उद्धव ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय. संतोष बांगर यांच्या बंडाची चित्रं तर अवघ्या महाराष्ट्रानं पाहिली. शिंदेंचं बंड झालं तेव्हा इकडे हिंगोलीत बांगर दादांनी रान उठवलं. उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ मोठी रॅली काढली. अत्यंत भावनिक होऊन बंडखोरांना परत येण्याचं आवाहन केलं. हे सांगताना त्यांना अश्रूही अनावर झाले होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बहुमत चाचणीच्या वेळी अचानक असं काय घडलं की, संतोष बांगर थेट निघाले आणि मला बंडखोरांच्या गटात शामिल व्हायचंय म्हटले. शिंदेंच्या बाजूने मतदानही केलं. हिंगोलीत परतले. एवढ्या टोकाच्या भूमिकांमागचं कारण विचारलं तर म्हणतात, नो कमेंट्स. त्यामुळे मतदार संघातल्या प्रत्येक शिवसैनिकाला, नागरिकाला आणि लाईव्ह पाहणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला एकंच दिसतंय. बांगर यांच्या मनात एक आणि ओठावर एक असतं का? तीन प्रसंगांवरून हे समजून घेता येईल.

डोळ्यातले ते अश्रू खरे की खोटे?

दिवस होता 21 जून 2022चा. 20 जून विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बंडखोर आमदार रात्रीतून गायब झाले. बंडखोरीचं वृत्त पसरलं तेव्हा उद्धव ठाकरेंवर निष्ठा असलेल्या आमदारांनी मोठं रान उठवलं. शिंदेंसह फुटलेल्यांना परत येण्याची विनवणी करू लागले. हिंगोलीतही आमदार संतोष बांगर यांनी मोठी रॅली काढली. भगव्यप्रति निष्ठा असणाऱ्यांना त्यांनी आवाहन केलं. म्हणाले, गळ्यातून हा भगवा काढला तर.. आम्ही एखाद्या विधवा स्त्रीप्रमाणे दिसतो… बांगर यांचे हे भावनिक उद्गार ऐकून निष्ठावंत शिवसैनिकांनाही अश्रू अनावर झाले असतील.

हॅलो शिंदेसाहेब.. तुमच्याकडे यायचंय…

21 जूनला अशा प्रकारे गावभर रॅली काढून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेप्रति निष्ठा दाखणारे संतोष बांगर सर्वांनी पाहिले. बंडखोरीचं वारं त्यांच्या पंचक्रोशीलाही शिवणार नाही, असं वाटलं. पण ऐनवेळी चक्र फिरले. 04 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदे यांची विधानसभेत बहुमत चाचणी झाली. यावेळी आमदार बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना स्वतः फोन करून सांगितलं. मला तुमच्या गटात यायचंय. मी तुमच्या बाजूने मतदान करणार.. त्यांनतर बांगर यांनी विधानसभेत शिंदेंच्या बाजूने मतदान केलं. बांगर यांच्या या बंडखोरीचा प्रवास उभ्या महाराष्ट्रानं हेरला.

आता म्हणतात, नो कॉमेंट्स…

06 जुलै रोजी हिंगोलीत संतोष बांगर परतले. राज्यातील इतर आमदारांप्रमाणे बांगर यांनाही वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे हिंगोलीत आल्यावर आमदार महाशय लगेच कामालाही लागले. तुमचा निर्णय ऐनवेळी कसा बदलला, यावर अजून प्रतिक्रियाही नाही. विचारली तर म्हणतात, तुम्हाला मी निघून जाऊ का इथून.. टेबलवर थाप देतात आणि नो कमेंट्स म्हणतात.
माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. पण दहा दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंचा झेंडा कवटाळणारे बांगर, अचानक बंडाचं निशाण कसं फडकावू शकतात? या निर्णयाचं उत्तर मतदारांसमोर तरी द्यावंच लागेल.