विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानाना पत्रं, मार्गही सविस्तरपणे सांगितला, वाचा पत्रं जसंच्या तसं

| Updated on: Sep 27, 2021 | 9:44 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे.

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानाना पत्रं, मार्गही सविस्तरपणे सांगितला, वाचा पत्रं जसंच्या तसं
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रस्तावित हायस्पीड रेल्वे, तसेच नागपूर- मुंबई हायस्पीड रेल्वेबाबत हे पत्र लिहिलं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमांदरम्यान विकासाची ब्लू प्रिंट मांडली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तातडीने पावलं उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. महाराष्ट्रातील प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प आणि सध्या सुरु असलेला समृद्धी महामार्ग यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधून, केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम केल्यास, हे प्रकल्प तातडीने पूर्णत्वाला जातील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पत्रात नेमकं काय? 

रेल्वे मंत्रालय, भारत सरकारने नुकत्याच मान्यता दिलेल्या सात हाय स्पीड रेल कॉरिडॉरपैकी महाराष्ट्रात नागपूर-नाशिक-मुंबई आणि मुंबई-पुणे-हैदराबाद यांचा समावेश आहे. राष्ट्रीय हायस्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) यांना जागेची पाहणी, व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एमएसआरडीसीकडे या कॉरिडॉरच्या एकीकरणासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.

पुढे, NHSRCL ने नागपूर-मुंबई कॉरिडॉरसाठी पर्यायाचा अभ्यास केला आहे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या साथीने हायस्पीड रेल कॉरिडॉर (HSRC) विकसित करण्याचा प्रस्ताव दिला आहे. समृद्धी महामार्ग हा एक प्रवेश नियंत्रित हरित महामार्ग प्रकल्प आहे. त्याची रुंदी 120 मीटर राइट ऑफ वे (ROW) तर लांबी 701 किमी आहे.

15 मार्च 2021 रोजी NHSRCL प्रतिनिधींनी पर्याय सादर केला आणि नागपूर-मुंबई हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसोबत समृद्धी महामार्गाची तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्यता अभ्यासण्याची विनंती केली. प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर हा एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) असून वर आणि खाली लांबी आणि रुंदी अंदाजे 17.50 मीटर असेल, जी पुढे बदलली जाऊ शकते.

समृद्धी महामार्गासाठी सहकार्य करा

जर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले, तर मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेलची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु केली जाऊ शकते. पुढे महाराष्ट्र सरकार असेही सुचवू इच्छिते की, मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे ही समृद्धी महामार्गाच्या RoW मध्ये जालन्यापर्यंत असेल, ती पुढे हैदराबादपर्यंत वाढवली ​​जाऊ शकते.

महाराष्ट्र सरकारने जालना आणि नांदेड दरम्यान एक्स्प्रेस वेला आधीच मान्यता दिली आहे. तर दुसरीकडे NHAI ने आधीच नांदेड ते हैदराबाद एक्सप्रेस वेची योजना आखली आहे. हायस्पीड रेलला सामावून घेण्याचे समान तर्क लावल्यास नागपूर आणि मुंबई, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेलचे नियोजन जालना मार्गे मुंबई-नांदेडच्या बाजूनेही करता येईल आणि पुढे प्रस्तावित नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस वे च्या RoW मध्ये नेता येईल.

पुणे – औरंगाबाद हायस्पीडने जोडा

त्याचप्रमाणे पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की मुंबई-नागपूर हा मार्ग मुंबई-नाशिक-औरंगाबादला जोडतो. तर मुंबई-हैदराबाद मार्गाचे विद्यमान रचनेनुसार  मुंबई ते पुणे हायस्पीड रेल मार्गाला जोडते. महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वेची योजना आखली आहे. पुणे आणि औरंगाबाद यांच्यात हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी झाल्यास हे चतुर्भुज पूर्ण होईल. हा सर्वात महत्त्वाचा औद्योगिक कॉरिडॉर आहे. तर पुणे-नाशिक-औरंगाबाद त्रिकोण आधीच राज्यातील वाहन उद्योगाचा आधारभूत आहे

मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे 

  • समृद्धी महामार्गासाठी सहकार्य केले, तर मुंबई-नाशिक-नागपूर हाय स्पीड रेलची अंमलबजावणी लवकरात लवकर सुरु केली जाऊ शकते.
  • मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे समृद्धी महामार्गाच्या RoW मध्ये जालन्यापर्यंत असेल, ती पुढे हैदराबादपर्यंत वाढवली ​​जाऊ शकते.
  • नागपूर आणि मुंबई, मुंबई-हैदराबाद हायस्पीड रेलचे नियोजन जालना मार्गे मुंबई-नांदेडच्या बाजूनेही करता येईल
  • पुढे प्रस्तावित नांदेड आणि हैदराबाद एक्स्प्रेस वे च्या RoW मध्ये नेता येईल.
  • पुणे आणि औरंगाबाद दरम्यानही हायस्पीड मार्ग देखील असणे आवश्यक
  • महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक दरम्यान सेमी-हायस्पीड रेल्वेची योजना आखली आहे
  • पुणे आणि औरंगाबाद यांच्यात हायस्पीड रेल कनेक्टिव्हिटी झाल्यास हे चतुर्भुज पूर्ण होईल

संबंधित बातम्या 

साखर साखर करत राहिलात तर भीक मागायची वेळ येईल : नितीन गडकरी

Special Report | महाविकास आघाडीचे नेतेही नितीन गडकरीचे ‘फॅन’!