वंचित बहुजन आघाडीचा शुक्रवारचा ‘अमन मार्च’ स्थगित, गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची घोषणा

| Updated on: Jun 16, 2022 | 11:02 PM

आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी देत, उद्याचा अमन मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा शुक्रवारचा अमन मार्च स्थगित, गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकरांची घोषणा
प्रकाश आंबेडकर, नेते, वंचित बहुजन आघाडी
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केल्या वादग्रस्त व्यक्तव्यानंतर देशभरात आगडोंब उसळला आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह अनेक राज्यात मुस्लिम संघटना आक्रमक बनल्या आहेत. अशावेळी ईशनिंदासृद्श्य कायदा देशात लागू करा, या मागणीसाठी वंचित बहुनज आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शुक्रवारी अमन मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची बैठक पार पडली. या बैठकीत दोन मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी देत, उद्याचा अमन मोर्चा रद्द केल्याची घोषणा केली आहे.

शुक्रवारचा ‘अमन मार्च’ स्थगित- आंबेडकर

गृहमंत्री वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. वळसे पाटील यांच्यासोबत दोन मागण्यांवर चर्चा ढाली. मोहम्मद पैगंबर आणि इतर धर्मगुरु यांचा अनादर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा पारित करावा. भाजप प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करावी, अशा मागण्या केल्याची माहिती आंबेडकर यांनी दिलीय. बैठकीत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कारवाईचं आश्वासन दिलं. पोलिसांकडून कारवाई सुरु असून लवकरच अटक करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. संजय पांडे निवृत्त होण्याआधी कारवाई करतील असा विश्वास आहे. देशात 6 प्रमुख धर्म आहेत. त्यांचे प्रेषित किंवा धर्मगुरु यांच्या संदर्भातील कायदा करण्यासाठी शासन लवकर निर्णय घेईल. याच अधिवेशनात कायदा केला जाईल. दोन्ही मागण्या मार्गी लावण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने मागण्या गंभीरतेने घेतल्याने उद्याचा अमन मार्च स्थगित करत आहोत. उद्या याच चर्चेनुसार अमन मार्चमधील सहभागी होणारे सर्वजण एकत्रित येणार आहेत. तिथे त्यांना समजावले जाईल, असं आंबेडकर यांनी सांगितलं.

मुंबई पोलिसांनी बजावला नुपूर शर्मांला समन्स

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात त्यांच्या वक्तव्यावरून गदारोळ सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. तर या आंदोलनांना हिंसक वळण लागल्याचंही पाहायला मिळालं. मंहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने नुपूर शर्मा यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावलं आहे. 25 जूनला हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यापूर्वीही नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस पाठविण्यात आली आहे. ऑल इंडिया इमाम कॉन्सिलकडून नुपूर शर्मा विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.