Shivsena | आधी बांगर, नंतर शिरसाट, आता सत्तार; मराठवाड्यातील नेत्यांचंच मुंबईत शक्तिप्रदर्शन का?

| Updated on: Jul 15, 2022 | 4:52 PM

एकिकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलंय तर दुसरीकडे मराठवाड्यातील आमदारांच्या मुंबई वाऱ्या वाढल्यात. यामागे काही महत्त्वाची कारणं लक्षात घेण्यासारखी आहेत.

Shivsena | आधी बांगर, नंतर शिरसाट, आता सत्तार; मराठवाड्यातील नेत्यांचंच मुंबईत शक्तिप्रदर्शन का?
Follow us on

औरंगाबादः हिंगोली ते मुंबई, 700 किलोमीटर अंतर, भर पावसात शेकडो शिवसैनिकांना घेऊन संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी मंगळवारी मुंबई दणाणून सोडली. तर गुरुवारी औरंगाबादहून शिवसैनिकांचा ताफा घेऊन आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मुंबई गाठली. रात्री बारा वाजता मुंबईत पोहोचलेल्या शिरसाटांच्या शिवसेना मेळाव्याला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मध्यरात्रीतून संबोधन केलं. तर शुक्रवारी दुपारी औरंगाबाद सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबईत शक्तिप्रदर्शन केलं. तसे तर एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतून फुटलेल्यांमध्ये राज्यभरातील आमदारांचा समावेश आहे. पण मराठवाड्यातील आमदारांचंच असं शक्तिप्रदर्शन का सुरु आहे? असे प्रश्न सामान्यांना पडत आहेत. एकिकडे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलंय तर दुसरीकडे मराठवाड्यातील आमदारांच्या मुंबई वाऱ्या वाढल्यात. यामागे काही महत्त्वाची कारणं लक्षात घेण्यासारखी आहेत.

मराठवाड्यात रुजलेली शिवसेना

महाराष्ट्रात मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेची सर्वाधिक रुजवात मराठवाड्यात सर्वाधिक पहायला मिळते. त्यानंतर कोकणात शिवसेनेचं अस्तित्व दिसतं. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही शिवसेना कमी प्रमाणात आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेल्या आमदारांमध्ये मराठवाड्यातील दिग्गज आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईत आपलं अस्तित्व अधिक ठळकपणे दाखवण्यासाठी आमदारांनी शक्तिप्रदर्शन केलंय, असं म्हणता येईल.

मंत्रिपदाची अपेक्षा

पुढील काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. एवढे दिवस मातोश्रीशी निष्ठा दाखवत राजकारण करणाऱ्यांनी बंडखोरी केली. या बंडखोरीचं फळ मिळण्याची वेळ आली आहे. आपल्या मतदारसंघातून मुंबईपर्यंत महारॅली काढत शक्तिप्रदर्शन केल्यास राज्यात आपलं किती वजन आहे, हे दाखवण्याचा आमदारांचा प्रयत्न असावा. संजय शिरसाटांनी तर औरंगाबादचे आमदार फोडण्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याचं बोललं जातंय. अब्दुल सत्तार तर पूर्वीपासूनच शिवसेनेत मंत्री होते. त्यामुळे आता शिंदेंच्या मंत्रिमंडळातही स्थान मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे. शिंदेंच्या बहुमत चाचणीला ऐनवेळी हजेरी लावणाऱ्या संतोष बांगर यांनाही एवढ्या मोठ्या कलाटणीचं चीज व्हावं, अशी अपेक्षा आहे. मंत्रिपद नाही तर किमान तगडं महामंडळ तरी आपल्याकडे यावं, ही इच्छा आमदारांची आहे.

जनाधार दाखवण्याचा प्रयत्न

ज्या-ज्या आमदारांनी बंडखोरी केली, तेथील शिवसैनिक आमदारांवर नाराज असल्याच्या प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून येत होत्या. त्यामुळे आमदारांनी आपापल्या मतदार संघातील शिवसैनिक पदाधिकारी आणि नेत्यांना घेत मुंबई गाठली. फक्त मीच नाही तर आमच्या भागातील सर्व शिवसेना नेते माझ्यासोबत असल्याचं या निमित्तांनी आमदारांनी दाखवून दिलं. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी तर जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, पंचायत समिती सदस्य आदी सर्वच शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना सोबत आणलं. त्यामुळे आता बंडखोरी केली तरीही जनतेच्या मनात तुमच्याबद्दल प्रचंड चीड आहे. पुढील निवडणुकीत तुम्हाला जनाधार मिळणार नाही, असं म्हणणाऱ्यांसाठीच एक सूचक संदेश आमदारांना यातून द्यायचा असेल.

निधीची अपेक्षा

उद्धव ठाकरेंविरोधात वेगळी चूल मांडण्यासाठी प्रत्येक आमदारांनं एक सामायिक कारण सांगितलं. ते म्हणजे आमच्या मतदारसंघाला निधीच मिळाला नाही. मात्र आता भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर आता मतदार संघात निधी नेला नाही तर जनतेसमोर हे आमदार सपशेल तोंडावर आपटणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मुख्यमंत्र्यांप्रती आपली निष्ठा किती आहे, हे दाखवण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे. यातून जास्तीत जास्त निधी मतदारसंघात नेण्याचा प्रयत्न केला जातोय.