Uddhav Thackeray: गुवाहटीतले 20 आमचेच.. मग कोर्टात गप्प का? शिंदेंचे वकील म्हणाले, आमच्याकडे 39! शिवसेनेच्या वकिलांनी खोडलंच नाही…

| Updated on: Jun 28, 2022 | 12:35 PM

शिंदेंकडील 39 पैकी 20 आमदार आमच्या बाजूने आहेत, असं कोणतंही वक्तव्य कोर्टात केलं गेलं नाही. त्यामुळेच शिवसेना बाहेर जाहीररित्या माध्यमांसमोर जे दावे करतेय, ते खोटे आहेत की काय असा संशय व्यक्त केला जातोय.

Uddhav Thackeray: गुवाहटीतले 20 आमचेच.. मग कोर्टात गप्प का? शिंदेंचे वकील म्हणाले, आमच्याकडे 39! शिवसेनेच्या वकिलांनी खोडलंच नाही...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) भगदाड पाडणाऱ्या एकनाथ शिंदे गटाने आमच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार (Shivsena MLA) आहेत असा दावा केलाय. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनीही वारंवार शिंदे गटाचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. गुवाहटीत गेलेले 15 ते 20 आमदार आमचेच आहेत. ते आमच्याशी संपर्कात आहेत, असे दावे शिवसेनेच्या वतीने जाहीररित्या करण्यात येत आहेत. मात्र काल सर्वोच्च न्यायालयात जेव्हा शिंदेगट आणि महाविकास आघाडी यांचे वकील आमने-सामने आले, तेव्हा शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाने जाहीर केलेल्या आकड्यासमोर कोणताही विरोध केला गेला नाही. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे 39 आमदार आहेत, असा युक्तीवाद केला तेव्हा शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी हा युक्तीवाद खोडून काढला नाही. शिंदेंकडील 39 पैकी 20 आमदार आमच्या बाजूने आहेत, असं कोणतंही वक्तव्य कोर्टात केलं गेलं नाही. त्यामुळेच शिवसेना बाहेर जाहीररित्या माध्यमांसमोर जे दावे करतेय, ते खोटे आहेत की काय असा संशय व्यक्त केला जातोय.

काल कोर्टात काय घडलं?

सर्वोच्च न्यायालयाने काल शिवसेनेच्या वतीने अपात्रतेची कारवाई सुरु करण्यात आलेल्या 16 आमदारांबाबतचा निर्णय जैसे थे ठेवला. यावर महाविकास आघाडीचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की, विधानसभा उपाध्यक्षांनी पाठवलेल्या नोटीशीला 16 आमदारांनी उत्तर दिले नाही आणि कोर्टाच्या निर्णयानुसार, पुढील सुनावणीपर्यंत त्यांच्या पात्रतेसंबंधीची स्थिती जैसे थे ठेवण्यात आली तर बंडखोरांकडून फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली जाऊ नये. यावर शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी तत्काळ युक्तिवाद केला. बंडखोर आता बाहेर पडलेच आहेत. मग महाविकास आघाडी सरकारला फ्लोअर टेस्ट का टाळायची आहे ? यावर कोर्टाने सांगितले की, फ्लोअर टेस्ट घ्यायचीच नाही, असे म्हटल्यास खूप गुंतागुंतीची स्थिती निर्माण होईल. त्यामुळे फ्लोअर टेस्टमध्ये काही तक्रार असल्यास महाविकास आघाडीला कोर्टात यायची द्वारं खुली आहेत.

शिंदेंच्या आकड्यासमोर शिवसेना वकिलांचा विरोधच नाही…

सुप्रीम कोर्टाच्या अंतरिम आदेशानुसार, शिंदे यांच्याकडे 39 आमदार आहेत. म्हणजेच ठाकरेंच्या शिवसेनेत फक्त 16 आमदार उरलेत. कोर्टात या आकडेवारीसंबंधी युक्तिवाद सुरु असताना शिवसेनेच्या वकिलांकडून काहीच विरोध केला गेला नाही. म्हणजेच बंडखोर आमदार फुटून गेल्यानंतरही शिवसेनेकडे 16 आमदार उरलेत, या युक्तिवादाशी शिवसेनाही सहमत आहे. त्यामुळे बाहेर राऊत, आदित्य आणि उद्धव ठाकरेंकडून जे दावे केले जात आहेत, त्यात फार तथ्य नसावे, असेच म्हणता येईल.

उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन?

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 21 जून रोजी देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याच्या बातम्या परसल्या आहेत. यावर शिवसेनेच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणवीसांना फोन केल्याच्या बातम्या या केवळ भूलथापा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असं स्पष्टीकरण शिवसेना संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देण्यात आलं आहे.