IPL 2021 : विराट कोहलीचा हुकमी गोलंदाज लवकरच लगीनगाठ बांधणार, RCB च्या पहिल्या सामन्यातून बाहेर

| Updated on: Mar 24, 2021 | 11:19 PM

आयपीएलचं 14 वं मोसम लवकरच सुरु होणार आहे. येत्या 9 एप्रिलपासून या मोसमाला सुरुवात होणार आहे (Adam Zampa will not play first match of RCB).

IPL 2021 : विराट कोहलीचा हुकमी गोलंदाज लवकरच लगीनगाठ बांधणार, RCB च्या पहिल्या सामन्यातून बाहेर
विराट कोहलीचा हुकमी गोलंदाज लवकरच लगीनगाठ बांधणार
Follow us on

चेन्नई : आयपीएलचं 14 वं मोसम लवकरच सुरु होणार आहे. येत्या 9 एप्रिलपासून या मोसमाला सुरुवात होणार आहे. या मोसमातील पहिलाच सामना हा हिटमॅन रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील आणि गेल्या मोसमात विजेता ठरलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. हा सलामी सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असणार आहेत. मात्र, या सामन्यात विराट कोहलीचा हुकमी गोलंदाज अ‍ॅडम जाम्पा हा खेळू शकणार नाही, अशी माहिती क्रिकबझने दिली आहे (Adam Zampa will not play first match of RCB).

अ‍ॅडम लवकरच लगीनगाठ बांधणार

अ‍ॅडम लवकरच लगीनगाठ बांधणार असल्याने तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. याबाबत रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु संघाचे क्रिकेट संचालक माईक हेसन यांनी संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे. ट्विटरवर त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत ते संघातील खेळाडूंविषयी माहिती देत आहेत (Adam Zampa will not play first match of RCB).

माईक हेसन नेमकं काय म्हणाले?

“IPL 2021 च्या पहिल्या सामन्यासाठी आमच्याकडे सर्व विदेशी खेळाडू उपलब्ध राहणार नाहीत. अ‍ॅडम जाम्पाचं लग्न होणार आहे. त्याच्यासाठी सध्याची वेळ ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विशेष अशी आहे. अ‍ॅडमला लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. अ‍ॅडम जेव्हा टुर्नामेंटमध्ये सहभागी होईल तेव्हा त्याचं महत्त्वपूर्ण योगदान देईल, असा आमचा विश्वास आहे”, असं माईक हेसन म्हणाले.

संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच अजून ऑस्ट्रेलियातच

“ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आणि स्टाफला सध्या विमान प्रवास करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक सायमन कॅटिच अजून चैन्नईत आलेले नाहीत. दुसरीकडे संघातील इतर खेळाडू सध्या चेन्नईत क्वारंटाईन आहेत. सायमन बऱ्याच काळापासून भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. ते पुढच्या एक-दोन दिवसात येतील, अशी आशा आहे”, असं देखील मत माईक हेसन यांनी मांडलं.

संबंधित बातमी : आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेपासून रंगणार थरार