नाचणी विकून हॉकी स्टिक खरेदी, आता प्रशिक्षणासाठी अमेरिकेला, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनीची संघर्षगाथा

| Updated on: Feb 16, 2020 | 4:45 PM

झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील हेसल या छोट्याश्या गावात पुंडी सारु वास्तव्यास आहे. अमेरिकेला जाण्याचं तिचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे तिने हॉकी स्टीक खेरदी करण्यासाठी घरातली नाचणी विकली होती (Pundi Saru will go america for hockey training).

नाचणी विकून हॉकी स्टिक खरेदी, आता प्रशिक्षणासाठी अमेरिकेला, नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनीची संघर्षगाथा
Follow us on

रांची : प्रचंड जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वप्न पूर्ण होऊ शकतात हे झारखंडच्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या पुंडी सारुने सिद्ध करुन दाखवलं आहे. पुंडी सारु आता लवकरच हॉकीची ट्रेनिंग घेण्यासाठी अमेरिकेत जाणार आहे. त्यासाठी सारु सज्जही झाली आहे (Pundi Saru will go america for hockey training).

झारखंडच्या रांची, खूंटी, लोहरदगा, गुमला आणि सिमडेगा भागातील 107 मुलींना रांचीच्या ‘हॉकी कम लीडरशीप कॅम्प’मध्ये प्रशिक्षण दिलं गेलं. यूएस कॉन्स्युलेट आणि ‘शक्तिवाहिनी’ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं. हा कॅम्प सात दिवस चालला. सात दिवसांच्या प्रशिक्षणानंतर पाच मुलींची निवड करण्यात आली. या मुलींना अमेरिकेत प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. या पाच मुलींमध्ये पुंडी सारुचं नाव आहे.

झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील हेसल या छोट्याश्या गावात पुंडी सारु वास्तव्यास आहे. अमेरिकेला जाण्याचं तिचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला प्रचंड संघर्ष करावा लागला. विशेष म्हणजे तिने हॉकी स्टीक खरेदी करण्यासाठी नाचणी विकली होती.

पुंडी सारुला चार भावंडं आहेत. त्यापैकी पुंडीचा दुसरा क्रमांक लागतो. पुंडीचा मोठा भाऊ सहारा सारुचं बारावीपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यानंतर त्याने शिक्षण सोडलं. पुंडी इयत्ता नववीत शिकत आहे. पुंडीला अजून एक मोठी बहिण होती. मात्र आज ती या जगात नाही. गेल्यावर्षी दहावीत नापास झाल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी पुंडीवर दु:खाचं आभाळ कोसळलं होतं.

मोठ्या बहिणीच्या मृत्यूनंतर दोन महिने पुंडी हॉकीपासून दूर राहिली होती. मात्र, ती हॉकीला विसरली नव्हती. पुंडीचे वडील एतवा सारु सध्या घरीच असतात. ते मजूर होते. मजुरीसाठी ते दररोज गावाहून सायकलने खुंटीला जायचे. मात्र, एकेदिवशी घरी परतताना त्यांना एका अज्ञात वाहनचालकाने टक्कर दिली. या अपघातात त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. यानंतर ते मजुरी करु शकले नाही.

पुंडीने तीन वर्षांपूर्वी हॉकी खेळायला सुरुवात केली आणि या खेळात नाव कमवायचं असं स्वप्न बघितलं. त्यावेळी तिच्याजवळ हॉकी स्टिक नव्हती. पुंडीने सांगितलं की, हॉकी स्टिक खरेदी करण्यासाठी तिच्याजवळ पैसे नव्हते. तेव्हा घरातील नाचणी (धान्य) विकली आणि शिष्यवृत्तीचे मिळालेले 1500 रुपये मिळवून स्टिक घेतली (Pundi Saru will go america for hockey training).

पुंडीचे वडील सध्या एतवा सारु जनावरांना चारायचं काम करतात. तर आई गृहिणी आहे. तिचं घर शेती आणि जनावरांच्या पालनपोषणावर चालतं. तिच्या घरात गाय, बैल, कोंबडी, शेळी आणि बकरी आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पुंडी हॉकी खेळण्यासाठी आठ किलोमीटर सायकल चालवून दररोज खूंटीला जाते, अशी माहिती तिने दिली. पुंडी खूंटीच्या बिरसा मैदानात तीन वर्षांपासून दररोज हॉकी खेळत आहे.

हॉकीमध्ये पुंडीने आतापर्यंत अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. पुंडीचे प्रशिक्षकही तिचं कौतुक करतात. “हॉकी स्टिकची खरेदी करण्यापासून ते मैदानावर येण्यापर्यंत प्रचंड संघर्ष करावा लागला. माझं लक्ष्य फक्त अमेरिकेत जाण्याचं नाही तर निक्की दीदी (भारतीय हॉकी संघाची सदस्या निक्की प्रधान) सारखं बनायचं आहे”, अशी प्रतिक्रिया पुंडीने दिली.

पुंडी आणि तिच्यासोबत असणाऱ्या चार मुली 12 एप्रिलला अमेरिकेला रवाना होतील, अशी माहिती यूएसच्या सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक सचिव मॅरी रोईस यांनी सांगितलं. अमेरिकेच्या मिडलबरी कॉलेज, वरमोंट येथे पुंडीला 21 ते 25 दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती मॅरी यांनी दिली.