संतापलेल्या धोनीने मैदानात येणं कितपत योग्य?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

RRvCSK जयपूर: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील थरारक सामन्यात कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पहिल्यांदाच संतापलेला पाहायला मिळाला. पंचांच्या निर्णयाविरोधात धोनी थेट सीमारेषा ओलांडून मैदानात गेला आणि चुकीच्या निर्णयाबद्दल वाद घालू लागला. धोनीच्या या कृत्याबद्दल त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी धोनीवर मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे. आयपीएल […]

संतापलेल्या धोनीने मैदानात येणं कितपत योग्य?
Follow us on

RRvCSK जयपूर: आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील थरारक सामन्यात कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) पहिल्यांदाच संतापलेला पाहायला मिळाला. पंचांच्या निर्णयाविरोधात धोनी थेट सीमारेषा ओलांडून मैदानात गेला आणि चुकीच्या निर्णयाबद्दल वाद घालू लागला. धोनीच्या या कृत्याबद्दल त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला आहे. आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी धोनीवर मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे.

आयपीएल आचारसंहितेनुसार नियम 2.20 अंतर्गत धोनीने गुन्हा कबूल केला आहे. खेळभावना न राखल्याने धोनीला दोषी धरण्यात आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

आयपीएलमध्ये काल चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूरमध्ये सामना झाला. या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा शेवटच्या चेंडूवर पराभव केला. चेन्नईने ही मॅच 4 विकेट्स राखून जिंकली.

मात्र शेवटच्या षटकात वादाची परिस्थिती उद्भवली. राजस्थानकडून शेवटची ओव्हर बेन स्टोक्स (Ben Stokes) टाकत होता. चेन्नईला 6 चेंडूत तब्बल 18 धावांची गरज होती. स्टोक्सने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजाने षटकार ठोकला. मग पुढचा चेंडू स्टोक्सने नो बॉल टाकला. त्यावर जाडेजाने 1 धाव घेतली. स्ट्राईकवर धोनी आला आणि त्याला फ्री हिट मिळाली. धोनीने दोन धावा घेतल्या. मग पुढच्या चेंडूवर स्टोक्सने धोनीच्या त्रिफळा उडवल्या. धोनी 58 धावा करुन माघारी परतला.

धोनी बाद झाला त्यावेळी चेन्नईला 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. त्यावेळी जाडेजाच्या जोडीला सँटेनर आला. स्टोक्सने सँटेनरला बाऊन्सर मारला, त्यावेळी अंपायरने काही क्षण नो बॉलसाठी हात दाखवला आणि लगेचच खाली घेतला. त्यामुळे नेमका नो बॉल आहे की नाही, प्रश्न सर्वांना पडला.

अंपायरच्या या चुकीमुळे मैदानाबाहेर बसलेला धोनी थेट मैदानात आला आणि अंपायरला जाब विचारु लागला. आधी नो बॉल दिला असताना पुन्हा हात खाली का असा सवाल करत धोनीने नो बॉलची मागणी केली. थोडावेळ मैदानात बाचाबाची झाल्यानंतर धोनी मागे परतला.

यानंतर पाचव्या चेंडूवर सँटेनरने 2 धावा घेतल्या. मग सँटेनरने पुढचा चेंडू वाईड टाकला. त्यामुळे चेन्नईला आणखी एक धाव मिळाली. चेन्नईला शेवटच्या चेंडूवर 3 धावांची गरज होती, त्यावेळी सँटेनरने षटकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

राजस्थानने चेन्नईसमोर ठेवलेलं152 धावांचं लक्ष्य चेन्नईने 6 विकेट्सच्या मोबदल्यात शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. चेन्नईकडून अंबाती रायुडूने 47 चेंडूत 57 आणि धोनीने 43 चेंडूत 58 धावा केल्या.