Tokyo Olympic 2021 : शेवटच्या 10 सेकंदात भारताच्या हातातून निसटलं कांस्य पदक, पैलवान दीपक पूनियाचा 4-2 ने पराभव

| Updated on: Aug 05, 2021 | 5:27 PM

भारतीय पैलवान दीपक पूनिया 86 किलो वजनी गटात सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर कांस्य पदकाच्या लढतीतही पराभूत झाला आहे. ज्यामुळे भारताच्या हातातून कांस्य पदक निसटलं आहे.

Tokyo Olympic 2021 : शेवटच्या 10 सेकंदात भारताच्या हातातून निसटलं कांस्य पदक, पैलवान दीपक पूनियाचा 4-2 ने पराभव
दीपक पूनियाचं कांस्य पदक हुकलं
Follow us on

Tokyo Olympics 20-2021 : एकीकडे भारताचा पैलवान रवी कुमार दहियाने 57 किलो वजनी गटात रौप्यपदकावार नाव कोरलं असताना दुसरीकडे 86 किलो वजनी गटात मात्र भारताच्या पदरी निराशा आली आहे. भारताचा युवा पैलवान दीपक पूनिया कांस्य पदकासाठीच्या लढतीत 4-2 अशा छोट्याशा फरकाने पराभूत झाला आहे. ज्यामुळे सॅन मरीनोच्या एम. एन. अमिने (M.N. Amine) याने देशासाठी पहिले वहिले ऑलिम्पिक पदक पटकावले आहे. सामन्याच्या सुरुवातीलाच दीपकने उत्तम खेळ दाखवत आघाडी घेतली होती. पण जसजसा सामना पुढे गेला अमिने यानेदेखील आक्रमक खेळ दाखवला. ज्यानंतर अखेरची 10 सेकंद शिल्लक असताना अमिनेने आपला शेवटचा डाव टाकत सामना 4-2 ने विजयी केला.

दीपक पूनियाने टोक्यो ऑलिम्पकमध्ये कडवी झुंज देत कांस्य पदकासाठीच्या सामन्यापर्यंत धडक मारली होती. सर्वांत आधी त्याने नायजेरियाच्या पैलवानाविरुद्ध टेक्निकल सिपरियॉरिटीच्या आधारावर 12-1 ने सामना जिंकत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्याठिकाणी चीनच्या पैलवानाला 6-3 ने धोबीपछाड करत तो सेमी फायनलमध्ये पोहचला. तिथे मात्र त्याला अमेरिकेचा पैलवान टेलर ली याने 10-0 ने मात दिली. ज्यानंतर आता कांस्य पदकासाठी तो सॅन मरीनोच्या एम. एन. अमिनेसोबत खेळत होता. ज्या ठिकाणी त्याला थोडक्यात पराभव पत्करावा लागला आहे.

भारताचं सहावं पदक हुकलं

यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा भारतासाठी चांगली ठरत आहे. भारताने आतापर्यंत 5 पदकं मिळवली असून आणखी काही भारताचे महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. पाच पैकी दोन रौप्य तर तीन कांस्य पदकं आहेत. यात सर्वांत आधी वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानूने रौैप्यपदक, त्यानंतर पीव्ही सिंधूने टेनिसमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं. ज्यानंतर बुधवारी लवलिनाने बॉक्सिंगमध्ये कांस्य तर आज सकाळी हॉकी पुरुष संघाने कांस्य पदक मिळवून देत भारतासाठी पदकांचा चौकार मारला. ज्यानंतर आता रवी दहियाने रौप्य पदक जिंकत पदकांची संख्या पाच केली. त्यानंतर दीपक आपला सामना जिंकून ही संख्या सहा करु शकला असता पण त्याचा पराभव झाल्याने आजच्या दिवसाखेर पदकांची संख्या पाचच राहिली.

हे ही वाचा :

Tokyo Olympic 2021 : पैलवान रवी दहियाची धडाकेबाज कामगिरी, कुस्तीत रौप्य पदकाची कमाई

Tokyo Olympic 2020 : ‘चक दे इंडिया’, 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक, भारताचा जर्मनीवर 5-4 ने विजय

(after ravi dahiya Indian Wrestler Deepak Punia loses match for bronze medal against M.N. Amine)