FUNERAL PROCESSION OF DOG: पाळीव कुत्र्याला अंजलीला निरोप देण्यासाठी अंत्ययात्रा! 17 वर्षांची साथ, कुटूंबाला अश्रू आवरेना…

| Updated on: Aug 09, 2022 | 12:51 PM

एवढेच नव्हे तर पारंपरिक हिंदू विधीनुसार या कुटुंबाने अंजलीचे अंतिम संस्कारही केले. तुन्नू गौडा असं या कुत्र्याच्या मालकाचं नाव असून ढोल-ताशांच्या गजरात आणि अनेक लोक सामील होऊन आपल्या पाळीव प्राण्याची त्यांनी अंत्ययात्राही काढली.

FUNERAL PROCESSION OF DOG: पाळीव कुत्र्याला अंजलीला निरोप देण्यासाठी अंत्ययात्रा! 17 वर्षांची साथ, कुटूंबाला अश्रू आवरेना...
FUNERAL PROCESSION OF DOG
Image Credit source: Social Media
Follow us on

आजकाल कुत्रा किंवा कुठलाही पाळीव प्राणी म्हणजे लोकांच्या आयुष्यातला अविभाज्य घटक असतो. अगदी त्यांचे अंत्यविधी सुद्धा कुटूंबातील इतर व्यक्तींप्रमाणे पार पाडले जातात. ओडिशाच्या परालाखेमुंडी येथून प्राणी प्रेमाची अशीच एक कहाणी समोर आली आहे जिथे एका कुटुंबाने आपल्या पाळीव कुत्र्याला, अंजलीला खास पद्धतीनं निरोप दिला. विशेष म्हणजे हा कुत्रा तब्बल 17 वर्षे कुटुंबासमवेत होता. एवढेच नव्हे तर पारंपरिक हिंदू विधीनुसार या कुटुंबाने अंजलीचे अंतिम संस्कारही केले. तुन्नू गौडा असं या कुत्र्याच्या मालकाचं नाव असून ढोल-ताशांच्या गजरात आणि अनेक लोक सामील होऊन आपल्या पाळीव प्राण्याची त्यांनी अंत्ययात्राही काढली.

कुत्र्याला भेटल्यानंतर त्याचं नशीबच पालटलं

सुमारे 16 वर्षे कुटुंबाची सेवा केल्यानंतर अंजलीने सोमवारी सकाळी सातच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. पशुवैद्यकीय डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. गौडा यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला गंभीर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागले. उदरनिर्वाहासाठी तो वेगवेगळ्या दुकानांमध्ये काम करायचा. 16 वर्षांपूर्वी कुत्र्याला भेटल्यानंतर त्याचं नशीबच पालटलं, असं गौडाचं मत आहे. त्याने अनेक कुत्र्यांना दत्तक घेतले, तरी कुटुंबीयांनी अंजली असे नाव दिलेल्या या कुत्र्याने आपल्याला सुदैव मिळवून दिल्याचा त्यांचा दावा आहे.
आपल्या प्रेमळ पाळीव प्राण्याच्या निधनानंतर गौडा आणि त्याचे कुटुंबीय अत्यंत दुःखात आहे . पाळीव प्राण्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सर्व सदस्य अस्वस्थपणे रडताना दिसले.

मिरवणुकीने स्मशानभूमीच्या मैदानावर

गौडा आणि त्याचे कुटुंबीय कुत्र्याला त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून वागवत असल्याने त्यांनी तिचा अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कुत्र्याला हळदीच्या पाण्याने आंघोळ घातली आणि नवीन कपड्यात गुंडाळून ठेवले आणि शेवटच्या प्रवासासाठी बाहेर काढण्यापूर्वी त्याला हार घातला. त्यानंतर या प्राण्याला सजवलेल्या वाहनात ठेवून मिरवणुकीने स्मशानभूमीच्या मैदानावर नेण्यात आले. हिंदू परंपरेनुसार गौडा यांनी आपल्या पाळीव कुत्र्याचे अंतिम संस्कार केले.

मी अंजलीसाठी सामुदायिक मेजवानी आयोजित करेन

गौडा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त, शहरातील अनेक प्राणीप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांनी अंजलीच्या शेवटच्या प्रवासात भाग घेण्यासाठी गर्दी केली होती. ‘गेली 16 वर्षे ती माझ्यासोबत होती. अंजली माझ्या घरी येण्यापूर्वी मी अनेक समस्यांशी झगडत होतो. तिला आणल्यानंतर सर्व काही बदलले आणि मला कधीही आर्थिक समस्या जाणवली नाही,” असे गौडा म्हणाले. “एखाद्या माणसाच्या मृत्यूनंतर जशी पूजा केली जाते, तशीच मी अंजलीसाठी सामुदायिक मेजवानी आयोजित करेन,” असंही गौडा यांनी सांगितलं.