बचत खात्यातील कमाई ठेवायची आहे सुरक्षित? ‘या’ सुरक्षा टिप्सकडे करु नका दुर्लक्ष; नाहीतर बँक खात्यावर पडेल दरोडा

| Updated on: Apr 29, 2022 | 11:03 AM

बचत खात्यातील (Saving Account) रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित व्यवहार करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही फिशिंगचे शिकार होऊ शकता आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

बचत खात्यातील कमाई ठेवायची आहे सुरक्षित? या सुरक्षा टिप्सकडे करु नका दुर्लक्ष; नाहीतर बँक खात्यावर पडेल दरोडा
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: Tv9
Follow us on

बचत खात्यातील (Saving Account) रक्कम सुरक्षित ठेवण्याचे सर्व प्रयत्न बँक करत असते. मात्र डिजिटल आणि ऑनलाईन (Digital And Online Method) पद्धतींमुळे व्यवहार करताना काळजी न घेतल्यास तुमची रक्कम सायबर भामटे (Cyber Hackers) हडप करु शकतात. त्यामुळे व्यवहारात अत्याधुनिक आयुधांचा वापर करताना फसवणुकीपासून वाचविण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. त्यासाठी बँक फसवणूक विषयी माहिती ठेवणे गरजेचे आहे. तुमचे एक चुकीचे पाऊल तुमचे आर्थिक नुकसान करणारे ठरु शकते. फिशिंग (Phishing), विशिंग, कार्ड स्किमिंग, चेक फ्रॉड असे अनेक फसवणुकीचे अनेक प्रकार घडतात. त्यामुळे बँक खाते रिकामे होऊ शकते. बचत खात्यातील रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित व्यवहार (Safe Transaction) करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही फिशिंगचे शिकार होऊ शकता आणि तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही खास टिप्स आहेत, त्याचा वापर केल्यास तुमचे बचत खाते सुरक्षित राहते.

पासवर्ड ठेवा मजबूत

तुमचा ऑनलाईन बँकिंग पासवर्ड कमकुवत असेल तर सायबर चोरटे तुमचे खाते सहजरित्या हॅक करु शकता आणि त्यात व्यवहार करु शकतात. तुमचा बँक खात्याचा पासवर्ड तुमच्या आवडत्या व्यक्ती नाव, मोबाईल क्रमांक, वाहन क्रमांक, लग्नतिथी, जन्मतारीख असे काहीबाही असू शकते. तर हा झाला कमकुवत पासवर्ड कारण तो सहजरित्या माहिती होतो. तुमच्या समाज माध्यमांवरील माहिती आधारे त्याचा अंदाज लावता येऊ शकतो आणि तुम्ही सायबर चोरट्यांचे शिकार होऊ शकतात. त्यामुळे पासवर्ड शक्यतो वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करा आणि तो कोणालाही शेअर करु नका

तुमची गोपनिय माहिती गुप्तच ठेवा

केवळ पासवर्ड शेअर केला म्हणजेच खाते हॅक होते असे नाही. तर तुमची व्यक्तिगत माहिती ही तुम्ही शेअर करता कामा नये. अनोळखी व्यक्तीशी तर चुकूनही बँक अथवा तुमच्या खात्याशी संबंधित माहिती सामायिक करु नका. निनावी फोन, अथवा बतावणी करणा-या फोनवर बोलताना तुमची खासगी माहिती जसे की, जन्म दिनांक, हस्ताक्षर, लग्नाची तारीख, कुटुंबातील सदस्यांची नावे, ओळखपत्र आणि त्याचा क्रमांक, मोबाईलवर आलेला ओटीपी याची माहिती देऊ नका

बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करा

बँक वेळोवेळी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांना सूचना पाठवत असते. त्यातील माहिती वाचून लक्षात ठेवा. सायबर चोरटे तुमच्या बँकेतील रक्कम हडपण्यासाठी निरनिराळ्या क्लृप्त्या अवलंबितात. त्यामुळे बँका याविषयीचा अलर्ट मॅसेज नेहमी पाठवत असतात. त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्याची अंमलबजावणी करा.