कोणता आरोग्य विमा तुमच्यासाठी योग्य, जाणून घ्या खास टिप्स

| Updated on: Jul 22, 2021 | 3:42 PM

Health Insurance | भारतातील बहुतेक कुटुंबे रु. 7-9 लाखापर्यंत विमा पॉलिसी घेतात. किमान 10 लाख रुपयांच्या पॉलिसी असणे चांगले असते. त्याचप्रमाणे, फॅमिली फ्लोटर पॉलिसी असेल तर विमा पॉलिसी जास्त रकमेची असावी, कारण त्यात पूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण घेतलेले असते.

कोणता आरोग्य विमा तुमच्यासाठी योग्य, जाणून घ्या खास टिप्स
आरोग्य विमा
Follow us on

मुंबई: पावसाळा हा अत्यंत आल्हाददायक ऋतू असतो आणि तो कडक उन्हाळ्यापासून सुटका करतो, यात वादच नाही. पण यावर्षी, सध्या सुरू असलेल्या महामारीमुळे प्रत्येकानेच या पावसाळ्यात आरोग्याची काकणभर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. साचलेले पाणी, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे जीवाणू तयार होतात. पावसाळ्यात सर्दी, ताप आणि इतर आजारांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. परिणामी, मलेरिया, टायफॉइड, डेंग्यू, आमांश, कावीळ इत्यादी आजार होऊ शकतात. या आजारांमुळे व्यक्तीच्या शरीरातील व्हाइट प्लेटलेट्स कमी होतात आणि आजाराशी लढा देण्याची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे कोव्हिड-१९ सारख्या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

तुमचे स्वतःचे आणि तुमच्या कुटुंबियांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यात आरोग्य विमा पॉलिसीची महत्त्वाची भूमिका असते. चांगली आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यासाठी फ्युचर जनराली इंडिया इन्श्युरन्सच्या डॉ. श्रीराज देशपांडे यांनी दिलेल्या टिप्स खालीलप्रमाणे

अधिक रकमेचे विमा संरक्षण देणारी सर्वसमावेशक पॉलिसी निवडा

वाढणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा विचार करून पुरेशा रकमेची विमा पॉलिसी निवडा. तुमचे वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि कुटुंबामध्ये आधीपासून असलेले आजार यावरून विमा पॉलिसीची तुमच्यासाठी आवश्यक किंवा पुरेशी रक्कम ठरत असते. आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आरोग्य विमा घेणाऱ्यांनी किमान ३ लाखांची विमा पॉलिसी घ्यावी. भारतातील बहुतेक कुटुंबे रु. 7-9 लाखापर्यंत विमा पॉलिसी घेतात. किमान 10 लाख रुपयांच्या पॉलिसी असणे चांगले असते. त्याचप्रमाणे, फॅमिली फ्लोटर पॉलिसी असेल तर विमा पॉलिसी जास्त रकमेची असावी, कारण त्यात पूर्ण कुटुंबासाठी विमा संरक्षण घेतलेले असते.

कोणतीही विमा पॉलिसी निश्चित करण्याआधी त्या उत्पादनाची/योजनेची वैशिष्ट्ये जाणून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही बेसिक पॉलिसीमध्ये पुढील संरक्षण मिळणे आवश्यक आहे : १) हॉस्पिटलायझेशनचा खर्च २) कोणत्याही वैद्यकीय गुंतागुंतीवर उपचार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च ३) उपचार आणि औषधांचा खर्च

तुमच्या विशिष्ट गरजा आणि कौटुंबिक पार्श्वभूमीनुसार विम्याची रक्कम कस्टमाइझ (तुमच्या आवश्यकतांनुसार) करण्याची लवचिकता उत्पादनात असणे गरजेचे आहे. बाजारात अशीही काही उत्पादने आहे, जी विमा रकमेच्या कमाल १००% पर्यंत संकलित बोनस देतात.

विस्तृत संरक्षण, किमान प्रतीक्षा कालावधी आणि अंतर्गत उप-मर्यादा नसलेल्या/कमी असलेल्या पॉलिसीची निवड करावी

बहुतेक विमा पॉलिसींमध्ये प्रतीक्षा कालावधी अंतर्भूत असतो. प्रतीक्षा कालावधीची तुलना करून त्यानुसार योजनेची निवड करणे आवश्यक असते आणि किमान प्रतीक्षा कालावधी असलेल्या पॉलिसीची निवड करावी.

विमा कंपनीने कितीही रकमेचे संरक्षण दिले असेल, पॉलिसीची रक्कम कितीही असेल तरी विशिष्ट आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट मर्यादेपलिकडे संरक्षण देण्यात येत नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये जास्त प्रीमिअम असेल तर उप-मर्यादा नसतात, कमी असेल तर उप-मर्यादा असतात. आरोग्य विमा पॉलिसी एकूण बजेट लक्षात घेऊनच निवडावी, पण उप-मर्यादा असलेल्या योजना मर्यादित संरक्षण देतात या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करू नये.

दाव्यांची भरपाई (क्लेम सेटलमेंट) देण्याची उत्तम पार्श्वभूमी असलेल्या विमाकर्त्याची निवड करावी

कमाल भरपाई प्रमाण (सेटलमेंट रेश्यो) असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीची निवड करणे हितावह असते. उच्च दावा भरपाई प्रमाण असलेली आरोग्य विमा पॉलिसी चांगली समजली जाते. सध्याच्या काळात, विशिष्ट आजारांसाठी विमा संरक्षण देणाऱ्या अनेक आरोग्य विमा पॉलिसी बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही व्हेक्टर सॅशे प्रोडक्ट्सची निवड करू शकता. या अंतर्गत, पावसाळ्यात डासांमुळे उद्भवणाऱ्या आजारांपासून विमा संरक्षण मिळू शकते. या पॉलिसींचा प्रीमिअम वाजवी असतो. तुमच्याकडे नियमित विमा पॉलिसी असेल तरी अतिरिक्त संरक्षण म्हणून या विशेष प्लॅनचा विचार करावा.

(How to pick right Health mediclaim policy)