ऑनलाइन जेवण महागात पडल्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकाला Zomatoचे प्रत्युत्तर; झटकली जबाबादारी !

| Updated on: Jul 09, 2022 | 1:31 PM

हॉटेलमधून मागवण्यात आलेल्या जेवणापेक्षा झोमॅटोवरून (Online) मागवण्यात आलेल्या जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागल्याची तक्रार राहुल काबरा याने केली होती. त्या तक्रारीची दखल घेत आता झोमॅटोने प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या हॉटेल्सद्वारे लागू करण्यात आलेल्या किमतींवर आमचे काहीही नियंत्रण नसते, असे सांगत झोमॅटोने आपली जबाबदारी झटकली आहे.  

ऑनलाइन जेवण महागात पडल्याची तक्रार करणाऱ्या ग्राहकाला Zomatoचे प्रत्युत्तर; झटकली जबाबादारी !
झोमॅटो
Image Credit source: tv9
Follow us on

एकाच प्रॉडक्टच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किमतीत जमीन-अस्मानाचा फरक असतो. ऑनलाइन विकताना कंपनी पहिल्यांदा वस्तूची किंमत जास्त दाखवतात आणि नंतर त्यावरच डिस्काउंटचे गाजर दाखवून ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतात. सध्याच्या काळात जेवण ऑनलाइन ऑर्डर (Online Food Order)वेगाने लोकप्रिय होत आहे. झोमॅटो हे त्यातील एक अग्रगण्य नाव असून , त्यांच्या ऑफरनंतरही एका ग्राहकाला ऑफलाइन ऑर्डरपेक्षा जास्त पैसे मोजावे लागल्याची घटना नुकतीच समोर आली होती. हॉटेलमधून मागवण्यात आलेल्या जेवणापेक्षा झोमॅटोवरून (Online) मागवण्यात आलेल्या जेवणासाठी जास्त पैसे मोजावे लागल्याची पोस्ट राहुल काबरा या युजरने लिंक्डइनवर (Linkedin) शेअर केली होती. या प्रकरणावर झोमॅटोने आता उत्तर दिले आहे. ‘आम्ही ग्राहक आणि हॉटेल यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावतो’, असे झोमॅटोने स्पष्ट केले. आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या हॉटेल्सद्वारे लागू करण्यात आलेल्या किंमतींवर आमचे काहीही नियंत्रण नसते, असे सांगत झोमॅटोने आपली जबाबदारी झटकली आहे.

काय आहे प्रकरण ?

लिंक्डइन (LinkedIn) या प्रोफेशनल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल काबरा या युजरने एक अनुभव शेअर केला होता. राहुल यांनी एकाच हॉटेलच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन ऑर्डरचे बिल शेअर केल. त्यांनी दोन्ही ठिकाणी एकच पदार्थ ऑर्डर केला, मात्र त्यांच्या किमती वेगवेगळया होत्या. राहुल यांनी दोन्ही वेळेस ब्लॅक पेपर सॉस, फ्राईड राईस आणि मोमोज ( Veg black pepper sauce, Vegetable fried rice, and Mushroom momo)ऑर्डर केले.ऑफलाइन ऑर्डर केल्यावर एकूण 512 रुपये बिल आले, ज्यामध्ये (CGST).आणि ( SGST)चा समावेश होता. आणि हेच पदार्थ ऑनलाइन ऑर्डर केल्यावर 689.90 रुपये बिल भरावे लागले , विशेष म्हणजे 75 रुपयांची सूट (Zomato Discount) मिळाल्यावरही एवढी रक्कम भरावी लागली.
लिंक्डइन वर अनुभव शेअर करताना राहुल यांनी लिहीले की, दोन्हीकडे सेम पदार्थ ऑर्डर करूनही ऑनलाइनमध्ये 178 रुपये म्हणजेच 34.76 टक्के जास्त रक्कम भरावी लागली. मला वाटतं किमतींमधील या तफावतीवर मर्यादा घातली पाहिजे. सरकारने यात हस्तक्षेप केला पाहिजे, जेणेकरून सर्व भागधारकांचा फायदा होईल. नव्या ग्राहकांशी जोडले जाण्यासाठी स्टार्टअप खूप प्रयत्न करत आहेत. ग्राहकांची लाइफटाइम व्हॅल्यू वाढवण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे.
कस्टमर ॲक्व्हिझिशन आणि रिटेंशनच्या बाबतीत झोमॅटो नेहमीच वरती राहिले आहे, असे मला वाटते. कारण झोमॅटोचे कॉन्स्टन्ट ओम्नी चॅनेल ॲडव्हर्टायझिंग राहिले आहे. पण हे लक्षात घेतले पाहिजे की एक सामान्य भारतीय ग्राहक नेहमी किमतीवर लक्ष ठेवतो. जिथे कमी किंमत असेल तिथेच खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती. डिस्काऊंटचे गाजर दखवून झोमॅटो लोकांकडून जास्त पैसे उकळत आहे, हे लोकांनाही लवकरच समजेल. तेव्हा ते झोमॅटोवरून ऑर्डर करणे बंद करतील किंवा दुसरा पर्याय निवडतील, असे त्यांनी म्हटले होते. या पोस्टवर हजारो रिॲक्शन्स आल्या. अनेक लोकांनी ऑनलाइन ऑर्डर केल्यावर किमतीतील भेदभावांचे अनुभव शेअर केले.

झोमॅटोने केले हात वर

या सर्व प्रकरणानंतर झोमॅटोने आता प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ग्राहक आणि हॉटेल यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका निभावतो’, असे झोमॅटोने स्पष्ट केले. आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या हॉटेल्सद्वारे लागू करण्यात आलेल्या किंमतींवर आमचे काहीही नियंत्रण नसते, असे सांगत झोमॅटोने आपली जबाबदारी झटकली आहे. संबंधित हॉटेलला आम्ही याप्रकरणाची माहिती दिली असून त्यावर विचार करून योग्य ती पाऊले उचलण्यास सांगितले आहे, असेही झोमॅटोने स्पष्ट केले आहे.

हे सुद्धा वाचा