Onion Damage: ही कसली दुश्मनी..! कांद्यावर युरिया टाकून नासाडी, न्यायासाठी शेतकऱ्याची भटकंती

| Updated on: May 08, 2022 | 9:37 AM

कांदा लागवड केल्यानंतर त्याच्या वाढीसाठी युरिया हा फायदेशीर ठरतो. मात्र, काढणी आणि छाटणी केलेल्या कांद्यावर युरिया टाकल्याने त्याला पाणी सुटून तो अवघ्या काही वेळामध्ये नासतो. कांदा पिकाचे नुकसान व्हावे याच उद्देशान शेलार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कांद्याच्या पातीमध्ये युरिया आढळून आल्याने कांदा नासण्याचे कारण समोर आले आहे.

Onion Damage: ही कसली दुश्मनी..! कांद्यावर युरिया टाकून नासाडी, न्यायासाठी शेतकऱ्याची भटकंती
काढणी केलेल्या कांद्यावर युरिया टाकल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मालेगाव : एकीकडे कांदा दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकरी हवालदिल आहे. सध्याच्या (Onion Rate) दरानुसार उत्पादनावर झालेला खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे साठवणूक करुन बळीराजा दरवाढीची प्रतिक्षा करीत आहे. मात्र, शेतकऱ्याचे हे प्रयत्नही काही अज्ञातांच्या पचनी पडले नाहीत. त्यामुळेच साठवलेल्या कांद्यावर चक्क (Urea) युरिया टाकून कांदा पिकाचे नुकसान करण्यात आले आहे. सटाणा तालु्क्यातील जुनी शेमळी येथील धर्मा शेलार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून यामध्ये तब्बल 200 क्विंटल (Onion Damage) कांद्याचे नुकसान झाले आहे. मात्र, या अनोख्या प्रकारामुळे एकच प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे ही कसली दुश्मनी..! हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर धर्मा शेलार यांनी पोलीस ठाण्यात तर तक्रार दाखल केली आहेच शिवाय कृषी विभागाकडे मदतीसाठी अर्ज-विनंत्या केल्या आहेत. त्यामुळे शेलार यांना न्याय मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पहिलाच प्रयत्न फसला, आता मदतीकडे लक्ष

जुनी शेमळी येथील धर्मा शेलार यांनी यंदा प्रथमच उन्हाळी कांद्याचा प्रयोग केला होता. त्यामुळे त्यांच्यासाठी सर्वकाही नवीनच होते. असे असतानाही त्यांनी क्षमतेपेक्षा अधिकचे उत्पादन काढले होते. मात्र, सध्या कांद्याचे दर घसरले असल्याने काही दिवस साठवणूक करुन पुन्हा विक्री करावी असा त्यांचा मानस होता. मात्र, काही समाजकंटकांनी साठवलेल्या कांद्यावरच युरिया टाकला आहे. त्यामुळे 200 क्विंटल कांद्याचे नुकसान झाले असून शेलार यांनी पोलीस ठाण्यात तर तक्रार नोंद केलीच आहे पण कृषी विभागाकडेही मदतीची मागणी केली आहे.

काढणीनंतर पौळवर केली होती साठवणूक

सध्या उन्हाळी कांद्याची काढणी कामे सुरु आहेत. कांदा हे नगदी पीक असल्याने धर्मा शेलार यांनीही उत्पादन वाढीच्या अनुशंगाने त्याची लागवड केली होती. कांदा पिकाचा प्रयोग हा त्यांच्यासाठी नवीनच होता. असे असतानाही त्यांनी 200 क्विंटल कांद्याचे उत्पादन घेतले होते. सरासरी एवढाही दर नसल्याने त्यांनी शेतातील पौळीवरच कांद्याची साठवणूक केली होती. मागणी वाढताच दरही वाढेल असा त्यांना विश्वास होता. मात्र, कांद्यावर युरिया टाकल्याने होत्याचे नव्हते होते.

हे सुद्धा वाचा

युरिया टाकल्याने नेमके काय होते?

कांदा लागवड केल्यानंतर त्याच्या वाढीसाठी युरिया हा फायदेशीर ठरतो. मात्र, काढणी आणि छाटणी केलेल्या कांद्यावर युरिया टाकल्याने त्याला पाणी सुटून तो अवघ्या काही वेळामध्ये नासतो. कांदा पिकाचे नुकसान व्हावे याच उद्देशान शेलार यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. कांद्याच्या पातीमध्ये युरिया आढळून आल्याने कांदा नासण्याचे कारण समोर आले आहे. आता शेलार यांनी अज्ञातांविरोधात तक्रार तर नोद केली आहे. संबंधितावर कारवाई आणि नुकसानभरपाई द्यावी ही अपेक्षा शेलार व्यक्त करीत आहेत.