Amazon : ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला मोठा दणका; ‘एनसीएलएटी’ने याचिका फेटाळली, 45 दिवसांत 200 कोटी जमा करण्याचे आदेश

| Updated on: Jun 13, 2022 | 1:45 PM

जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला मोठा दणका बसला आहे. कंपनीने सीसीआय विरोधात केलेली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. तसेच कंपनीला 45 दिवसांत दोनशे कोटी रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Amazon : ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला मोठा दणका; एनसीएलएटीने याचिका फेटाळली, 45 दिवसांत 200 कोटी जमा करण्याचे आदेश
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) मोठा दणका बसला आहे. कंपनीच्या वतीने भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) दिलेल्या निर्णयाविरोधात नॅशनल लॉ अपीलेटकडे (NCLAT) याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र अ‍ॅमेझॉनची ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यासोबतच कंपनीला पुढील 45 दिवसांत 200 कोटी रुपये जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. भारतीय स्पर्धा आयोगाकडून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अ‍ॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या डीलला स्थगिती देण्यात आली होती. या सोबतच नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉनला दोनशे कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर कंपनीने सीसीआयच्या या निर्णयाविरोधात ‘एनसीएलएटी’कडे धाव घेतली होती. मात्र एनसीएलएटीने देखील सीसीआयचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करत अ‍ॅमेझॉनची याचिका फेटाळून लावली आहे. तसेच कंपनीला पुढील 45 दिवसांमध्ये 200 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाकडून गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अ‍ॅमेझॉनवर कारवाई करण्यात आली होती. अ‍ॅमेझॉनने फ्यूचर ग्रुपसोबत केलेल्या डीलला स्थगिती देण्यात आली होती. तसेच कंपनीला दोनशे कोटी रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आला होता. या विरोधात अ‍ॅमेझॉनने एनसीएलएटीकडे याचिका दाखल केली. परंतु एनसीएलएटीने आज अ‍ॅमेझॉनची याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती एम वेणुगोपाल आणि न्यायमूर्ती अशोक कुमार मिश्रा यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने सीसीआयचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत ही याचिका फेटळाली. तसेच कंपनीला आजपासून पुढील 45 दिवसांमध्ये 200 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा अ‍ॅमेझॉनसाठी मोठा झटका असल्याचे माणण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

कॅटकडून निर्णयाचे स्वागत

दरम्यान एनसीएलएटीने दिलेल्या या निर्णयाचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ‘कॅट’कडून स्वागत करण्यात आले आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे कॅटने म्हटले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना कॅटचे अध्यक्ष बीसी भरतिया यांनी म्हटले आहे की, ‘सत्याचाच नेहमी विजय होतो’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विदेशातील कोणतीही बडी कंपनी येऊन भारतातील छोटे व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांवर दडपशाही करु शकत नाही. न्यायाधिकरणाने योग्य निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे अ‍ॅमेझॉन सारख्या कंपन्यांना चपराक बसली आहे.