inflation : जागतिक बाजारात गव्हाच्या दरात घसरण; भारतात कधी कमी होणार भाव?

| Updated on: Jul 30, 2022 | 2:48 PM

घाऊक बाजारपेठेत (wholesale market) गव्हाचे दर (Wheat rates) खूप वाढले आहेत. मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील तीच स्थिती आहे.

inflation : जागतिक बाजारात गव्हाच्या दरात घसरण; भारतात कधी कमी होणार भाव?
Follow us on

नवी दिल्ली : घाऊक बाजारपेठेत (wholesale market) गव्हाचे दर (Wheat rates) खूप वाढले आहेत. मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये गव्हाच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. राजस्थान (Rajasthan) आणि उत्तर प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये देखील गव्हाचे दर वाढलेले दिसून येतात.या अगोदर गव्हाचे दर वाढल्यानंतर दर नियंत्रित करण्यासाठी सरकार गोदामातल्या गव्हाची विक्री खुल्या बाजारात करत असे.परंतु यावेळी गव्हाच्या सरकारी खरेदीमध्ये 57 टक्के घसरण झालीये.खुल्या बाजारातील विक्रीसाठी सरकारकडे खूपच कमी गहू शिल्लक आहे.नियमानुसार सरकारकडे आणीबाणीच्या वेळी 275.80 लाख टन गहू असणं गरजेचं आहे. पण जुलै महिन्यात केवळ 285.10 लाख टन गव्हाच्या साठ्याची नोंदणी करण्यात आलीये. म्हणजे नियमानुसार केवळ 10 लाख टन गहूच जास्त आहे. हा साठा गेल्या 14 वर्षांतील सर्वात कमी साठा आहे. 2021 मध्ये सरकारी गोदामात 600 लाख टनापेक्षा जास्त गहू होता.

निर्यातीवर बंदी

सरकारनं गव्हाचा देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी 13 मेपासून निर्यातीवर देखील बंधनं घातली आहेत. 13 मे आधीच करार करण्यात आल्यानं निर्यात बंधन असतानाही 16 लाख टन गव्हाच्या निर्यातीला परवानगी देण्यात आलीये.यावर्षी एप्रिल आणि मेमध्ये 26 लाख टन गहू निर्यात करण्यात आलाय. ही निर्यात गेल्या वर्षांपेक्षा 4 टक्के अधिक आहे. या निर्यातीमुळेही देशांतर्गत पुरवठ्यात मर्यादा आलीये.जागतिक स्तरावर यंदा गव्हाचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे आणि खप हा उत्पादनापेक्षा जास्त असणार आहे.

रशिया, युक्रेनमधून निर्यात सुरू

यावर्षी संपूर्ण जगभरात 77.16 कोटी टन गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज अमेरिकेच्या कृषी विभागानं वर्तवलाय. हे उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत 74 लाख टनांनी कमी आहे. यावर्षी जगभरात गव्हाचा खप 78.42 कोटी टन असू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे गव्हाचा पुरवठा जगभरात कमी होण्याची शक्यता आहे.संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीनंतर गहू उत्पादनात अग्रेसर देश असलेल्या रशिया आणि यूक्रेनमध्ये करार झालाय. दोन्ही देशांनी युद्धामुळे काळ्या समुद्रामार्गे होणारी गव्हाची निर्यात थांबवली होती. करारा झाल्यानं युक्रेन आणि रशियातून गहू निर्यातीचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

भारताची स्थिती काय?

जुलैच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचा दर 335 डॉलर प्रति टन इतका होता तो आता कमी होऊन 325 डॉलर प्रति टनांवर आलाय. परदेशातून गव्हाची आयात झाल्यानंतरच भारतात गव्हाचे दर कमी होण्याची शक्यता आहे. सध्या गव्हाच्या आयातीवर 40 टक्के शुल्क असल्यानं आयात होणं अशक्य आहे. म्हणजेच देशांतर्गत उत्पादन आणि पुरवठ्यावरच गव्हाची किंमत ठरणार आहे. सध्या देशांतर्गत पुरवठ्यात वाढ होण्याची शक्यता खूपच कमी आहे.