…तर 2.5 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 20% टीडीएस कापला जाणार

| Updated on: Jan 24, 2020 | 11:28 PM

हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) तयार केला असून तो 16 जानेवारीपासून लागूही करण्यात आला आहे. हा नियम त्या लोकांवर लागू होईल, ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल.

...तर 2.5 लाखाच्या वार्षिक उत्पन्नावर 20% टीडीएस कापला जाणार
Budget 2021-22
Follow us on

नवी दिल्ली : आयकर विभागाने कर नियमांमध्ये काही बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, जर तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे आणि जर तुम्ही नियोक्त्याला पॅन आणि आधार क्रमांक (Pan and Aadhaar Details) दिलेला नसेल, तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. आयकर विभागाच्या नव्या नियमांनुसार, जर एखादा कर्मचारी त्याच्या नियोक्त्याला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल, तर त्याच्या पगारामधून 20 टक्के टीडीएस (Tax deducted at source) कापून घेतला जाईल.

नवा नियम कधी लागू होणार

हा नियम केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) तयार केला असून तो 16 जानेवारीपासून लागूही करण्यात आला आहे. हा नियम त्या लोकांवर लागू होईल, ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक असेल (Income Tax new rule).

CBDT ने त्यासाठी 86 पानांचं परिपत्रक जारी केलं आहे. यानुसार, आयकर कायद्याच्या कलम 206-एए अंतर्गत कर्मचार्‍यांना त्यांच्या नियोक्त्याला पॅन आणि आधार क्रमांक देणे अनिवार्य आहे. जर एखादा कर्मचारी ही माहिती देत नसेल, तर नियोक्ता त्याच्या वार्षिक पगारावर कर दराने कपात करु शकतो किंवा त्याच्या पगारात 20 टक्क्यांची कपात करु शकतो.

जर तुमचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल, तर तुमच्या पगारामधून कोणताही कर कापला जाणार नाही.

नियम काय म्हणतो?

पॅन आणि आधार कार्ड क्रमांक नसल्याने क्रेडीट जारी करण्यात अडचण येत आहे. अशा परिस्थितीत करात कपात करणाऱ्यांना टीडीएस स्टेटमेंटमध्ये आधार आणि पॅन कार्डची माहिती देण्यास सांगितलं जातं, असं CBDT ने सांगितलं. त्यामुळे तुम्हाला तुमचा 20 टक्के टीडीएस कापला जाऊ नये असं वाटत असेल, तर नियोक्त्याला पॅन आणि आधारची माहिती तात्काळ द्या.