LPG : गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार, या ग्राहकांना मोठा फटका बसणार

LPG Cylinder Rule : 5 किलोच्या सिलेंडरबाबत अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असतात. या सिलेंडरच्या होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. याची माहिती जाणून घेऊयात.

LPG : गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरीसाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार, या ग्राहकांना मोठा फटका बसणार
LPG 5gk Cylinder Delevery charge
Image Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 10:08 PM

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम भारतावरही झाला आहे. गेल्या काही काळापासून भारताला होणारा LPG चा पुरवठा घटला आहे. भारतात सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना एलपीजी सिलेंडरचा अतिरिक्त साठा ठेवण्याचे निर्देश दिले असून गॅसच्या किंमतीतही वाढ केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कमर्शियल आणि 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. या 5 किलोच्या सिलेंडरबाबत अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या फार कमी लोकांना माहिती असतात. या सिलेंडरच्या होम डिलिव्हरीसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

किती आहे डिलिव्हरी चार्ज?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार ग्राहक पॉइंट ऑफ सेलच्या माध्यमातून छोट्या गॅस सिलेंडर रिफिलची होम डिलिव्हरी मिळवू शकतात. मात्र, त्यासाठी प्रत्येक रिफिलवर 25 रुपये अतिरिक्त डिलिव्हरी शुल्क द्यावे लागते. ग्राहक छोटा सिलेंडर कोणत्याही अधिकृत इंडेन गॅस वितरकाकडून, इंडियन ऑइल रिटेल आउटलेट, निवडक किराणा दुकान किंवा सुपरमार्केटमधून खरेदी करू शकतात. तसेच देशभरातील कोणत्याही अधिकृत पॉइंट ऑफ सेल किंवा वितरकाकडून सिलेंडरची रिफिलिंगही करता येते.

या सिलेंडरची मोठी खासियत म्हणजे तो घेण्यासाठी पत्त्याचा पुरावा आवश्यक नसतो. फक्त ओळखपत्राच्या आधारे कनेक्शन मिळू शकते. तसेच ग्राहकांनी पॉइंट ऑफ सेलमधून सिलेंडर खरेदी करून नंतर परत केल्यास कंपनी प्रति सिलेंडर 500 रुपये निश्चित रक्कम परत करते. सिलेंडर किती काळ वापरला गेला याचा त्यावर परिणाम होत नाही.

11 रुपयांनी वाढले दर

1 जून रोजी कमर्शियल एलपीजीसोबतच 5 किलोच्या छोट्या सिलेंडरच्या किंमतीतही वाढ करण्यात आली. 5 किलोच्या छोट्या गॅस सिलेंडरची किंमत 11 रुपयांनी वाढून 821.50 रुपये झाली आहे. याशिवाय 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरची किंमत 42 रुपयांनी वाढून दिल्लीत 3,113.50 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 3,071.50 रुपये होती.

1 मे रोजी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत तब्बल 993 रुपयांची मोठी वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती ग्राहकांना दिलासा देत 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 913 रुपयांवर स्थिर ठेवण्यात आली आहे. या सिलेंडरच्या किंमतीत शेवटची वाढ मार्चच्या सुरुवातीला 60 रुपयांनी करण्यात आली होती. मात्र सध्या त्यात वाढ झालेली नाही.

 

Follow Us