सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र द्यावं लागणार, देशभरातील सराफांचा मोठा निर्णय

| Updated on: Jan 06, 2021 | 3:21 PM

या आदेशानुसार आता पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. | gold buying in jewellers

सोने खरेदीसाठी आता ओळखपत्र द्यावं लागणार, देशभरातील सराफांचा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली: कोरोना संकटानंतर भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी मोठी उसळी घेतल्याचे चित्र दिसत आहे. ही परिस्थिती पाहता 2021च्या दिवाळीपर्यंत सोन्याचा (Gold) दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (KYC documents are mandatory for gold buying in jewellers)

या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.

एवढेच नव्हे तर आगामी काळात सोने-चांदीच्या दागिने खरेदीसाठी आर्थिक व्यवहारांप्रमाणे KYC सादर करावे लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने 28 डिसेंबरला सोन्याच्या व्यापाराला PMLA (Prevention of Money Laundering Act) कायद्याच्या अखत्यारित आणल्याची अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे आता ईडीला कोणत्याही कागदपत्रांशिवाय सोन्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची तपासणी करण्याचे अधिकार मिळाले आहेत.

या आदेशानुसार आता पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

रोखीच्या व्यवहारांसाठी KYC ची मागणी

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.

सोन्याच्या व्यवहारांसाठी सरकार विशेष धोरण आखण्याच्या तयारीत

‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सोन्यासह मौल्यवान धातुंच्या व्यवहारांसाठी एक विशेष धोरण आखण्याची तयारी सुरु आहे. त्यानुसार सोन्यातील गुंतवणुकीचा संपत्तीमध्ये (Asset) समावेश होईल. सध्याच्या नियमांनुसार दागिन्यांचा समावेश ‘undisclosed treasure’ मध्ये केला जातो.

भारतात दरवर्षी 850 टन सोन्याची आयात होते. त्यामुळेच या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

सोनं खरेदीसाठी जाताय तर लक्षात असूद्या ‘या’ 3 गोष्टी, नाहीतर होईल नुकसान

सोन्याचं नेमकं काय होणार? वाढत जाणार की कमी होणार?

…म्हणून आताच करा सोनं खरेदी, दिवाळीपर्यंत बसेल खिशाला कात्री

(KYC documents are mandatory for gold buying in jewellers)