झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?

TBZ Jewellers : 160 वर्षांहून अधिक जुना दागिन्यांचा ब्रँड तिभुवनदास भिमजी झवेरी (TBZ) आता चेन्नईस्थित जीआरटी ज्वेलर्सने विकत घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

झवेरी कुटुंबाचा 5 पिढ्यांचा प्रवास संपला, 162 वर्षांचा TBZ ब्रँड 1,033 कोटींना विकला, नवा मालक कोण?
TBZ and GRT
Image Credit source: Google
| Updated on: Sep 07, 2026 | 11:59 PM

मुंबईतील प्रसिद्ध आणि तब्बल 160 वर्षांहून अधिक जुना दागिन्यांचा ब्रँड तिभुवनदास भिमजी झवेरी (TBZ) आता चेन्नईस्थित जीआरटी ज्वेलर्सने विकत घेतला आहे. जीआरटीने TBZ मधील विद्यमान प्रवर्तकांचा 74 टक्के नियंत्रक हिस्सा 1,033 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. या व्यवहारानंतर झवेरी कुटुंबाचा पाच पिढ्यांपासून सुरू असलेला व्यवसायातील प्रवास संपला आहे. TBZच्या 37 स्टोअर्ससह ब्रँडचा ताबा GRT कडे गेला असून, नियंत्रक हिस्सा मिळाल्याने GRTला सार्वजनिक भागधारकांसाठी खुली ऑफरही द्यावी लागणार आहे.

1864 मध्ये सुरू झाला होता TBZचा प्रवास

TBZ ची सुरुवात 1864 मध्ये मुंबईतील झवेरी बाजारात भिमजी झवेरी यांनी एका छोट्या दुकानातून केली होती. त्यानंतर त्यांचे पुत्र त्रिभोवंदास भिमजी झवेरी यांनी व्यवसायाचा विस्तार करत अनेक नवीन शोरूम सुरू केली. पुढील जवळपास पाच पिढ्यांनी हा व्यवसाय पुढे नेत TBZ चा विस्तार 28 शहरांमध्ये 37 स्टोअर्सपर्यंत केला. यातील बहुतांश स्टोअर्स महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आहेत.

TBZ च्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे 65 टक्के महसूल लग्नसमारंभ आणि विशेष प्रसंगांसाठीच्या दागिन्यांच्या विक्रीतून येतो. हलक्या वजनाच्या मौल्यवान दागिन्यांना प्रोत्साहन देणे, सोन्या-हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी लाइफटाइम बायबॅक, प्रमाणित सॉलिटेअर हिरे आणि 100 टक्के BIS हॉलमार्क असलेले 22 कॅरेट सोन्याचे दागिने यांसारख्या उपक्रमांमुळे TBZने भारतीय दागिने बाजारात वेगळी ओळख निर्माण केली.

IPO नंतरही अपेक्षित वेगाने विस्तार झाला नाही

TBZ ने 2012 मध्ये शेअर बाजारात प्रवेश करताना आक्रमक विस्तारासाठी IPOमधून निधी उभारला होता. पुढील तीन वर्षांत स्टोअर्सची संख्या 57 पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, हे लक्ष्य पूर्ण झाले नाही. IPO नंतर तब्बल 14 वर्षांनीही TBZ ची स्टोअर्सची संख्या 37 इतकीच आहे. यामागे दागिन्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक मागणारा असणे हे एक प्रमुख कारण मानले जाते. नवीन स्टोअर सुरू करण्यापूर्वी मोठ्या प्रमाणात सोने आणि हिऱ्यांचा साठा ठेवावा लागतो. त्यामुळे देशभरात मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यासाठी मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते.

वाढत्या सोन्याच्या किमतींचाही परिणाम

TBZ ला आणखी एका समस्येचा सामना करावा लागला तो म्हणजे वर्किंग कॅपिटलचा. कंपनी स्वतः मोठ्या प्रमाणावर दागिने तयार करते. तिच्याकडे हिरे दागिने उत्पादन आणि सोन्याच्या शुद्धीकरणाची सुविधा तसेच कारागीर आणि विक्रेत्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भांडवल इन्व्हेंटरीमध्ये अडकते. सोन्याच्या किमती वाढल्याने आवश्यक इन्व्हेंटरीचा खर्चही वाढला. त्यामुळे व्यवसायासाठी पुरेसा सोन्याचा साठा ठेवण्यासाठी कंपनीला अधिक कर्ज घ्यावे लागले. ICRAच्या माहितीनुसार, कंपनीचा कर्जावरील अवलंबित्वाचा स्तर 2024 मधील 1.4 पटवरून 2025 मध्ये 1.9 पट झाला.

महसूल आणि नफा वाढला, पण विक्रीचे घटली

TBZ च्या व्यवसायात आर्थिक वाढ दिसून आली आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचा महसूल 12 टक्के CAGR ने वाढून 3,202 कोटी रुपये झाला. याच कालावधीत EBITDA सुमारे पाचपट वाढून 358 कोटी रुपये, तर निव्वळ नफा तब्बल 12 पट वाढून 200 कोटी रुपये झाला. मात्र, या वाढीमागे सोन्याच्या वाढलेल्या किमतींचाही मोठा वाटा आहे. प्रत्यक्ष विक्रीचे प्रमाण मात्र वाढलेले नाही. गेल्या तीन वर्षांत सोन्याच्या विक्रीचे प्रमाण 3,424 किलोवरून 2,249 किलोपर्यंत घटले आहे. हिऱ्यांच्या विक्रीचे प्रमाणही 47,371 कॅरेटवरून 39,031 कॅरेट झाले आहे.

GRT ला TBZ मुळे पश्चिम भारतात मोठी संधी

या डीलमागे भौगोलिक विस्तार हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. जीआरटी ज्वेलर्सची दक्षिण भारतात मजबूत पकड आहे, तर TBZचा पश्चिम भारतात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मजबूत व्यवसाय आहे. त्यामुळे TBZच्या माध्यमातून GRTला देशाच्या पश्चिम भागात मोठे रिटेल नेटवर्क मिळणार आहे. याशिवाय GRT च्या दक्षिण भारतीय व्यवसायात साध्या सोन्याच्या दागिन्यांचा वाटा मोठा आहे. या प्रकारच्या दागिन्यांमध्ये तुलनेने कमी मार्जिन असते. त्याउलट TBZचा लग्नातील दागिने, हिरे आणि डिझाइन-केंद्रित उत्पादनांमध्ये मजबूत व्यवसाय आहे. त्यामुळे GRTला अधिक मार्जिन असलेल्या या विभागातूनही वाढीची संधी मिळू शकते.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us