दुप्पट फायद्याचं आमिष अन् कोट्यवधींचा गंडा, सहा आरोपींनी असा रचला खेळ !

| Updated on: Sep 30, 2023 | 3:08 PM

कर्नाटक पोलिसांनी 854 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा आरोपींनी देशभरातील हजारो लोकांची फसवणूक केली. हे फसवणूक करणारे लोकांना दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवायचे आणि त्यांना गंडा घालायचे.

दुप्पट फायद्याचं आमिष अन् कोट्यवधींचा गंडा, सहा आरोपींनी असा रचला खेळ !
Follow us on

बंगळुरू | 30 सप्टेंबर 2023 :  ऑनलाइन माध्यमातून, तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या सहाय्याने लोकांशी संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवायचे. तसेच ठराविक काम केलेत तर किंवा ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील, अशी लालूच दाखवत लोकांना लुबाडणारे अनेक गुन्हेगार सध्या कार्यरत आहेत. झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने लोकही पुढचा मागचा विचार करत नाहीत आणि सरळ मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवून बसतात. मात्र बऱ्याच जणांची यात फसवणूक होते आणि दुप्पट पैसे तर सोडाच गुंतवलेल्या मूळ रकमेवरही पाणी सोडावे लागते. सायबर क्राईमचे (cyber crime)  असे अनेक गुन्हे सध्या घडताना दिसत आहेत.

कर्नाटक पोलिसांनी देखील अशाच कोट्यवधींच्या सायबर फसणवुकीचा गुन्हा उघडकीस आणला.  बंगळुरू येथे पोलिसांनी 854 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी देशभरातील हजारो लोकांची फसवणूक केली, त्यांचे पैसे लुटून त्यांना गंडा घातला असे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी ५ कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हे भामटे लोकांशी संपर् साधायचे आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे. सुरूवातील ते लोकांना 1,000 ते 10,000 रुपयां पर्यंतची रक्कम गुंतवायला सांगायचे. हे पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला दररोज 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो, असे आमिष भामटे लोकांना दाखवायचे. जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासाने देशभरातील अनेक नागरिकांनी यामध्ये पैसे गुंतवले, काही लोकांनी तर एक लाख तर काही दहा लाखांपेक्षाही अधिक रक्कम गुंतवल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बँकेच्या खात्यांमध्ये पैसे करायचे ट्रानस्फर

भामट्यांच्या बोलण्यात गुंतून अनेक लोकांनी पैसे ट्रानस्फर करायचे. एकदा का पैसे खात्यात आले की आरोपी लगेचच ऑनलाइन माध्यमातून ते पैसे इतर बँकेच्या खात्यात वळवायचे. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या लोकांनी पैसे काढायचा प्रयत्न केला पण त्यांना कोणताही रिफंड मिळाला नाही. अशा तऱ्हेने काही पैशांच्या मोबदल्यात अनेक लोकांनी त्यांची मेहनतीची कमाई गमावल्याचे समोर आले.

एकदा संपूर्ण पैसे जमा झाल्यानंतर आरोपी मनी लाँड्रिंगशी संबंधित खात्यांवर पैसे पाठवायचे. आरोपींनी क्रिप्टो (बिनान्स), पेमेंट गेटवे, गेमिंग ॲप्स आणि इतर माध्यमातून एकूण 854 कोटी रुपयांची फसवणूक केली असे पोलिसांनी सांगितले.