लग्नानंतर दोन वर्षातच पत्नीचे केस झाले पांढरे, संतापलेल्या पतीने केले असे…

पांढऱ्या केसावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले. पांढऱ्या केसांवरुन पत्नीला टोमणे मारु लागला, सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मानसिक त्रास देऊ लागला.

लग्नानंतर दोन वर्षातच पत्नीचे केस झाले पांढरे, संतापलेल्या पतीने केले असे...
पत्नीचे केस पांढरे झाले म्हणून पतीने केले असे
Image Credit source: social
वैजंता गोगावले | Updated on: Nov 29, 2022 | 12:27 PM

सारन : लग्नानंतर दोन वर्षातच पत्नीचे केस पांढरे झाल्याने पतीने गुपचूप दुसरा विवाह करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बिहारमधील सारन जिल्ह्यात उघडकीस आला आहे. पत्नीला या विवाहाची माहिती मिळताच ती आपल्या वडिलांसह लग्नस्थळी पोहचली आणि हा विवाह रोखला. यानंतर दोन्ही कुटुंबात जोरदार भांडण झाले. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पीडित पत्नीच्या तक्रारीनुसार पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

दोन वर्षापूर्वीच झाला होता विवाह

सारन जिल्ह्यातील साहजितपूर येथील बबीता देवी हिचा बनियापूर येथील पंकज साह याच्याशी दोन वर्षापूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये वाद सुरु झाले. मात्र घरातील मोठ्यांनी दोघांमधील वाद मिटवला.

दोन वर्षातच पत्नीचे केस पांढरे झाल्याने दोघांमध्ये भांडण

यानंतर लग्नाच्या दोन वर्षातच बबीताचे केस पांढरे झाले. पत्नीचे पांढरे केस पाहून पंकजने घरात हंगामाच केला. पांढऱ्या केसावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले. पांढऱ्या केसांवरुन पत्नीला टोमणे मारु लागला, सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन मानसिक त्रास देऊ लागला.

पतीकडून सतत होणाऱ्या छळाविरोधात बबीताने पोलिसात तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांमध्ये समझोता करुन दिला. मात्र त्यानंतरही पंकज बदलला नाही.

मंदिरात सुरु होता दुसरा विवाह

पंकजने गुपचूप दुसरा विवाह करण्याचा प्लान केला. त्यानुसार रविवारी सायंकाळी तो मंदिरात गुपचूप दुसरा विवाह करत होता. मात्र स्थानिक लोकांनी याची माहिती बबीताला दिली. त्यानंतर बबीता आपल्या वडिलांसह तेथे पोहचली आणि विवाह रोखला.

सासरच्यांनी गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचाही महिलेचा आरोप

मंदिरात हंगामा होताच पंकजसह सर्व लोक तेथून पळून गेले. सासरच्यांनी आपला गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही बबीताने केला आहे. रसगुल्ले आणि भातामध्ये औषध मिसळून सासरच्यांनी आपला गर्भपात करण्याचा प्रयत्न केल्याचे बबीताने पोलिसांना सांगितले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us