वाहनाला वाचवण्याच्या नादात ट्रक उलटला! रस्त्यावरील टोमॅटोचा खच पाहून लोकांनी काय केलं बघा

| Updated on: Oct 31, 2022 | 11:40 AM

टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात! अपघातापेक्षाही लोकांची कृती का ठरली असंवेदनशील?

वाहनाला वाचवण्याच्या नादात ट्रक उलटला! रस्त्यावरील टोमॅटोचा खच पाहून लोकांनी काय केलं बघा
ट्रकचा अपघात
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

धुळे : धुळे येथे टोमॅटो वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात (Dhule Accident News) झाला. रस्त्यावर हा ट्रक उलटला आणि त्यामुळे ट्रकमधील (Truck Accident) टोमॅटो रस्त्यावर पडून मोठं नुकसान झालं होतं. विशेष म्हणजे या अपघातानंतर लोकांनी रस्त्यावर पडलेला टोमॅटोचा (Tomato) खच पाहिला आणि टोमॅटो लुटण्यासाठी एकच गर्दी केली. मिळेल त्या पिशवीत, गोणीत भरुन टोमॅटोची लोकांनी लूट केल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

नाशिकहून इंदूरकडे मालवाहू ट्रक जात होता. या ट्रकमधून टोमॅटो वाहून नेले जात होते. मात्र पहाटेच्या सुमारास ट्रकचा अपघात घडला. समोर असलेल्या एका वाहनाला वाचवण्याच्या नादात चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक पलटी झाला.

या अपघातात ट्रकच्या पुढच्या भागाला मोठा फटका बसला. तर चालकही गंभीररीत्या जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावर टोमॅटोचा सडा पडला होता. ट्रकमधील टोमॅटोचे ट्रे रस्त्यावर पडले होते. दरम्यान, या हायवेवरील वाहतूकही या अपघातामुळे प्रभावित झाली होती.

हे सुद्धा वाचा

महामार्ग पोलीस, मोहाडी पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य केलं. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवण्यात आला. मात्र तोपर्यंत लोकांनी ट्रकमधील टोमॅटो लुटण्यासाठी चांगलीच गर्दी केली होती.

पोलिसांच्या उपस्थितीतच लोकांनी रस्त्यावर पडलेले टोमॅटो पिशवीत आणि गोणीमध्ये भरले. काहींनी तर दूध वाहून नेणाऱ्या कॅनमध्येही टोमॅटे भरले आणि पळ काढला.

अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. भाज्यांचे दरही महागले आहेत. अशातच शेतकऱ्यांना तर फटका बसलाच. पण अपघातामुळे लोकांनी टोमॅटोवर हात साफ केल्याचं चित्रही यावेळी पाहायला मिळालं.

या अपघातात जखमी झालेल्या चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातामुळे या मार्गावरील काही काळ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, आता पुन्हा खोळंबलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.