पोलीस अधिकाऱ्याने खेळाडूंना काढायला लावल्या उठाबशा, क्रिकेट टर्फमध्ये नक्की काय घडलं?

| Updated on: May 23, 2023 | 2:16 PM

मध्यरात्री उशिरापर्यंत काही तरुण क्रिकेट टर्फमध्ये क्रिकेट होते. रात्री नाईट राऊंडला असलेल्या पोलिसांनी दबंगगिरी करत खेळाडू आणि मॅनेजरला शिवीगाळ केली.

पोलीस अधिकाऱ्याने खेळाडूंना काढायला लावल्या उठाबशा, क्रिकेट टर्फमध्ये नक्की काय घडलं?
क्रिकेट टर्फमध्ये पोलिसाची दादागिरी
Image Credit source: TV9
Follow us on

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही बंद करायला सांगत टर्फमध्ये क्रिकेट खेळत असलेल्या खेळाडूंना आणि टर्फच्या मॅनेजरला शिवीगाळ करत उठाबश्या काढायला लावल्या. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी टर्फ चालकाने केली आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी कानावर हात ठेवले आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांना विचारणी केली. संबंधित मॅनेजरवर केस करण्यात आली असून, प्रकरण न्यायालयात पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र अधिकाऱ्याच्या दबंगगिरीवर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

मध्यरात्री उशिरापर्यंत तरुण टर्फमध्ये खेळत होते

अंबरनाथच्या चिखलोली पाडा परिसरात अथेना टर्फ आहे. या टर्फमध्ये 20 मे रोजी रात्री अडीच वाजताच्या सुमारास काही तरुण क्रिकेट खेळत होते. यावेळी रात्रगस्तीवर असलेले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुहास पाटील हे तिथे आले. पाटील यांनी या खेळाडूंसह टर्फचे मॅनेजर केवल विकमानी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यानंतर टर्फच्या मॅनेजरला सीसीटीव्ही बंद करायला सांगत सगळ्या खेळाडूंनी एकमेकांच्या कानाखाली मारा, असं सांगितलं. इतक्यावरच न थांबता त्यांनी सर्व खेळाडू आणि टर्फचे मॅनेजर यांना प्रत्येकी 200-200 उठाबश्या काढायला लावल्या.

पोलिसाची दबंगगिरी सीसीटीव्हीत कैद

टर्फच्या मॅनेजरने सीसीटीव्ही बंद न केल्यानं हा सगळा प्रकार टर्फमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आवाजासहित कैद झाला. यानंतर टर्फ मॅनेजर केवल विकमानी यांना पोलीस ठाण्यात नेत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. या सगळ्या प्रकारानंतर केवल विकमानी यांनी आज हे सीसीटीव्ही फुटेज घेत माध्यमांकडे आपली व्यथा मांडली. सुहास पाटील हे नेहमीच आपल्याला त्रास देत असून, खेळाडूंना शिव्या देण्याचा आणि शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला? असा सवाल यानंतर टर्फ मॅनेजर केवल विकमानी यांनी उपस्थित केलाय. तसंच याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केलीय आहे.

हे सुद्धा वाचा

पुराव्यासहित समोर आलेल्या या प्रकारानंतर वरिष्ठ अधिकारी यांची काही दखल घेतात का? हे पहावं लागेल. टर्फ हा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. या टर्फला कायदेशीर परवानगी आहे का? ही एक संशोधनचा विषय आहे.