नो पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी उचलण्यास अडवले, टोईंग कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला हाणले !

टोईंगचे कर्मचारी नो पार्किंगमधील वाहने उचलत होते. यावेळी एका दुकानासमोर उभी असलेली दुचाकी उचलताना दुकानदाराने अडवले. यानंतर जोरदार राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

नो पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी उचलण्यास अडवले, टोईंग कर्मचाऱ्यांनी दुकानदाराला हाणले !
पुण्यात टोईंग कर्मचाऱ्यांची दुकानदाराला मारहाण
Image Credit source: TV9
| Updated on: May 01, 2023 | 7:55 PM

अभिजीत पोते, पुणे : नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्या उचलण्यास आलेल्या टोईंग कर्मचाऱ्यांनी एका दुकानदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुण्यातील हडपसर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रमेश बराई असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याबाबत अद्याप पोलिसात कोणतीही नोंद करण्यात आली नाही. संबंधित घटनेची माहिती घेऊन दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन पुणे पोलिसांनी दिलं आहे.

काय घडले नेमके?

रमेश बराई यांचं सोलापूर महामार्गावर मंडईत फुटवेअरचे दुकान आहे. या दुकानासमोर लावलेल्या एका दुचाकीवरून हा सगळा राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. टोईंगचे कर्मचारी हडपसर परिसरातील नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत होते. कारवाई दरम्यान टोईंग कर्मचारी बराई यांच्या दुकानासमोर उभी असलेली त्यांची दुचाकी उचलायला गेले. यावेळी बराई यांनी कर्मचाऱ्यांना अडवले. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी बराई यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, हा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप घटनेची नोंद केली नाही.