Imran Khan : इम्रान खानकडे फक्त 11 दिवस, भारत सोडावा लागणार की इथेच राहणार? कोर्टातून मोठी माहिती समोर!
Imran Khan : इम्रान खानला भारत सोडून जाण्याची नोटीस मिळाली असून याप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे.

भारतीय नागरिकत्व नसतानाही आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला ‘भारत सोडा’ नोटीस बजावली आहे. त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यास सांगण्यात आलं आहे. इम्रान खान हा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा भाचा आहे. वृत्तानुसार, त्याच्याकडे अमेरिकन पासपोर्ट आहे. इम्रान खाननं मुंबई उच्च न्यायालयात या नोटीसला आव्हान दिलं असून, त्याच्या वकिलानं तो आंदोलनाचा भाग नव्हता असं म्हटले आहे. या वादामुळे अभिनेत्याचा आगामी चित्रपट, ‘अधुरे हम अधुरे तुम’, अडचणींचा सामना करत आहे. अशातच आता याप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे.
इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव
भारत सोडण्याच्या नोटीस विरोधात अभिनेता इम्रान खानानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून अभिनेत्याच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आता न्यायालय काय निकाल देतं, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांच्या तक्रारीनं झाली. सोमैया यांनी मुंबई पोलीस आणि एफआरआरओ यांना पत्र लिहून आरोप केला की, अमेरिकी नागरिक म्हणून इम्रान खान यांचा राजकीय आंदोलनांमधील सहभाग हा ओसीआय नियम आणि व्हिसाच्या अटींचं थेट उल्लंघन आहे.
नागरिकत्व कायद्यानुसार, ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना भारतात वास्तव्य आणि प्रवासाचे विशेषाधिकार दिले जातात, परंतु त्यांना भारतात कोणतेही राजकीय हक्क बजावण्याची किंवा आंदोलनांमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सीजेपीने आयोजित केलेल्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ही संपूर्ण कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.
इम्रान खाननं मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या सीजेपीच्या आंदोलनात भाग घेतला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं, पण नंतर सोडून देण्यात आलं. इम्रान खान अमेरिकन नागरिक असून त्याचा जन्म अमेरिकेत झाला आहे. त्याचे वडील अनिल पाल हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत आणि त्याची आई नुझात खान या मानसशास्त्रज्ञ आहेत. इम्रानचे आजोबा कोलकात्याचे बंगाली होते, ज्यांनी एका ब्रिटिश महिलेशी लग्न केलं होतं. इम्रानचे वडील बंगाली हिंदू वंशाचे अँग्लो-इंडियन आहेत. त्यांनी मन्सूर खान यांच्यासोबत आयआयटी मुंबईमध्ये शिक्षण घेतलं. इम्रानची आई पश्तून आणि अरब वंशाची मुस्लिम महिला असून ती एका चित्रपट कुटुंबातील आहे. ती दिग्दर्शक-निर्माता नासिर हुसेन यांची मुलगी, दिग्दर्शक-निर्माता मन्सूर खान यांची बहीण आणि अभिनेता आमिर खानची चुलत बहीण आहे. इम्रान खान अमेरिकेचा नागरिक आहे.