Akanksha Choudhary : मला किडनॅप केलेलं अन्…प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत पुण्यात घडला धक्कादायक प्रकार, सांगितली आपबिती
Akanksha Chaudhary : प्रसिद्ध अभिनेत्री आकांक्षा चौधरीनं तिच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला आहे.

‘लॉक अप २’ ची स्पर्धक आकांक्षा चौधरी नुकतीच एका कार्यक्रमासाठी पुण्यात गेली होती. तिला कार्यक्रमाच्या आयोजकांकडून एक त्रासदायक अनुभव आला. आकांक्षानं आरोप केला आहे की, आयोजकांनी तिचं अपहरण केलं आणि तिला पैसेही दिले नाहीत. तिनं सांगितलं की, आयोजकांनी तिची आशिष नावाच्या एका व्यक्तीची आणि आणखी एका गायिकेची फसवणूक केली.
आकांक्षानं सांगितला धक्कादायक प्रकार
आकांक्षानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर अनेक व्हिडिओ शेअर करून घडलेला प्रकार सांगितला. आकांक्षानं दावा केला की, आयोजकांनी तिला आणि एका मुलीला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि एका मैदानात नेलं. आकांक्षा म्हणाली, ‘जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा समोरच मोठ्या संख्येनं प्रेक्षक होते. माझ्या आणि प्रेक्षकांमध्ये फक्त एक छोटीशी बॅरिकेडिंग होती आणि माझी गाडी अगदी त्यांच्या समोर उभी करण्यात आली होती. इतक्या गर्दीत मी आत जाऊ शकत नाहीये आणि माझी टीमही माझ्यासोबत नाहीये, असं मी ओरडून सांगत होते.’
आयोजकांनी आकांक्षाचं ऐकलं नाही, उलट तिची खिल्ली उडवली. हा संपूर्ण प्रकार एक स्कॅम असल्याचं आकांक्षानं सांगितलं. आशिष नावाच्या व्यक्तीशी आपला संबंध असल्यानं, आपण या इव्हेंटसाठी होकार दिला होता, ज्याचा चुलत भाऊ हा इव्हेंट सांभाळत होता. मात्र, त्यानेही कोणतीही जबाबदारी घेतली नाही, असं आकांक्षानं सांगितलं. ‘मला एक प्रकारे किडनॅपच करण्यात आलं होतं. जेव्हा मी एकाला कानाखाली मारली तेव्हा हा सगळा प्रकार थांबला.’ असंही आकांक्षा पुढे म्हणाली.
आकांक्षाने एक व्हिडिओसुद्धा शेअर केला असून घडलेला प्रकार समोर आणला आहे. तिच्या कारभोवती अनेक लोक जमलेले दिसत आहेत. आकांक्षानं सांगितलं की, ‘त्यांनी जाणीवपूर्वक गर्दीच्या समोर गाडी थांबवली आणि दरवाजा उघडला. इतक्या गर्दीसमोर स्वतःला वाचवण्यासाठी मला कार लॉक करावी लागली. आम्हाला कुठे घेऊन जायचं याबद्दल ते ते मराठीत बोलत होते, पण आम्हाला ते समजलं नाही.’