Taruni Sachdev : तिला मृत्यूची अगोदरच कल्पना, सर्वांना शेवटचं भेटली, बिग बींसोबत काम केलेल्या ‘रसना गर्ल’चा दुर्दैवी अंत; 14व्या वाढदिवशीच…
Taruni Sachdev : 'रसना गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणी सचदेवचा वयाच्या 14व्या वर्षी मृत्यू झाला. काय घडलेलं नेमकं? जाणून घ्या.

आयुष्य कोणतं वळण घेईल हे कोणालाच माहीत नसतं! तरुणी सचदेवची कहाणीही अशीच आहे. लहान वयातच, आपल्या गोड हास्यानं आणि ‘आय लव्ह यू रसना’ या टॅगलाइननं तरुणीनं सर्वांची मनं जिंकली. करिश्मा कपूरसोबतच्या त्या एका टीव्ही जाहिरातीनं तरुणीच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. तिला रुपेरी पडद्यावर राज्य करायचं होतं. पण आता तरुणी फक्त आपल्या आठवणीतच जिवंत आहे, कारण वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी तिचं निधन झालं.
तरुणी सचदेवचा जन्म १४ मे १९९८ रोजी मुंबईत झाला. तिचे वडील हरीश सचदेव हे एक उद्योगपती आहेत. वयाच्या अवघ्या ५ व्या वर्षी तरुणीनं लाईट्स, कॅमेरा आणि ॲक्शनच्या दुनियेत प्रवेश केला. जाहिरातपटांमधील तिची लोकप्रियता इतकी वाढली की, ती त्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी बालकलाकार बनली. तिनं शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केलं होतं. पण २०१२ मध्ये नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात तरुणीचा मृत्यू झाला.
तरुणी शाहरुख खानच्या ‘आर यू स्मार्टर दॅन अ फिफ्थ ग्रेडर?’ या टीव्ही शोमध्ये स्पर्धक म्हणूनही सहभागी झाली होती. २००४ मध्ये तरुणीला तिची पहिली चित्रपटातील भूमिका मिळाली. तिनं ‘वेल्लिनाक्षत्रम’ या मल्याळम चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. चित्रपटाचे दिग्दर्शक विनयन यांनी एका मुलाखतीत सांगितलं, ‘मी तरुणीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका जाहिरातीत काम करताना पाहिलं. मी जाहिरात एजन्सीकडून तिचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला. जेव्हा तरुणीनं फोन उचलला, तेव्हा ती म्हणाली, ‘काका, मला चित्रपटांमध्ये काम करायचं आहे.’
तरुणी सचदेवचा मृत्यू
तरुणीनं ‘पा’ या चित्रपटातही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं होतं. शाळेत असताना ती त्यांची मैत्रीण झाली होती. तरुणीचं १४ मे २०१२ रोजी म्हणजेच वाढदिवशीच निधन झालं. त्यावेळी तरुणी 14 वर्षांची होती. नेपाळमधील अग्नी एअर फ्लाइट CHT विमान अपघातात तिचा मृत्यू झाला. तरुणीसोबत तिची आई, गीता सचदेव, देखील होत्या. तरुणीसोबतच त्यांचाही मृत्यू झाला. तरुणीच्या निधनानंतर तिच्या मित्रांनी सांगितलं की, तिला कदाचित काहीतरी अघटित घडणार असल्याची पूर्वकल्पना मिळाली असावी. कारण, तिनं नेपाळला जाण्यापूर्वी प्रत्येकाला मिठी मारली आणि म्हणाली, ‘आज मी तुम्हा सर्वांना शेवटचं भेटतेय.’ तिनं आपल्या मित्रांना आय लव्ह युसुद्धा म्हटलेलं.