Aasif Khan : कोरोनरी आर्टेरी पूर्णपणे बंद…मृत्यूच्या दाढेतून परतलेला बिग बॉस फेम अभिनेता, बायकोनं सांगितला कठीण काळ
Aasif Khan : वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी आसिफ खानला हृदयविकाराचा झटका आलेला. याबद्दल अभिनेत्याच्या पत्नीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे.

अभिनेता आणि ‘बिग बॉस २०’ चा स्पर्धक आसिफ खानच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत त्याच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. आसिफच्या पत्नीनं ही पोस्ट नुकत्याच एका वादामुळे शेअर केली आहे. बिग बॉसच्या घरात आसिफचा सह-स्पर्धक काझी तौकीरनं एका वादादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याचं नाटक केलं होतं.
आसिफ खानच्या पत्नीनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘हो, वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी आसिफला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला जो त्रास झाला तो खरा होता हे सिद्ध करण्यासाठी आता मला त्याचे मेडिकल रिपोर्ट शेअर करावे लागतील. लोकांना पटवून देण्यासाठी मला इतकी वैयक्तिक बाब शेअर करावी लागेल, याची मी कधी कल्पनाही केली नव्हती.’
आसिफनं सुरुवातीला सांगितलेलं की, त्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, तर जीईआरडी (GERD) आहे आणि तो भीतीपोटी होतो. त्याला काळजी होती की, जर लोकांना त्याच्या गंभीर आरोग्य समस्येबद्दल कळलं, तर त्याचा परिणाम त्याच्या कामावर होऊ शकतो, असं आसिफची पत्नी म्हणाली.
कठीण काळाबद्दल बोलताना आसिफची म्हणाली की, ‘डॉक्टरांनी मला सांगितलं की, त्याची मुख्य कोरोनरी आर्टेरी पूर्णपणे बंद झाली आहे, हे मी कधीही विसरणार नाही. मी आयसीयू, स्टेंट आणि तो क्षण कधीही विसरणार नाही, जेव्हा माझे पती त्यांच्या स्वप्नातील भविष्य गमावण्याच्या भीतीने रडत होते आणि मी त्यांना मिठीत घेतलं होतं.’
आसिफच्या पत्नीनं त्याच्या आरोग्याच्या समस्येची खिल्ली उडवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ती म्हणाली, ‘हे प्रकरण टीकेच्या पलीकडे गेलं आहे. आम्हाला अत्यंत घाणेरड्या शिव्या, आसिफला जीवे मारण्याच्या धमक्या आणि आमच्या कुटुंबातील महिलांना बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आहेत. याचं समर्थन कशानेही होऊ शकत नाही. बिग बॉस हा एक मनोरंजनावर आधारित रिॲलिटी शो आहे, पण मनोरंजन हे क्रूरतेचं निमित्त कधी बनलं? मतभेद हे कोणाचा जीव धोक्यात घालण्याचं किंवा त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचं कारण कधी बनलं?’
अलीकडील एका एपिसोडमध्ये, काझी तौकीरनं आपली प्रसिद्ध डान्स स्टेप सादर केली. आसिफ खाननं त्याला कंटाळवाणं म्हटलं. यामुळे दोघांमध्ये वाद झाला. काझीने कथितरित्या हृदयविकाराचा झटका आल्याचं नाटक केल्यावर हा वाद आणखी वाढला आणि त्यामुळे आसिफला खूप दुःख झालं.